पुणे ः गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी बजावली. पुण्याचा प्रथमेश शेरला, स्पर्धेतील ११वा सीड याने उत्कृष्ट खेळ करत तिसरे स्थान पटकावले आणि ५६ एलो रेटिंग पॉइंट्स मिळवले.
या शानदार यशामुळे प्रथमेश आशियाई अंडर-१६ स्पर्धेसाठी (२०२६) पात्र ठरला. ११ पैकी त्याने ७ विजय, ३ बरोबरी आणि १ पराभव अशी दमदार कामगिरी केली. वीरेश एस यांनीही उत्तम खेळ करत दहावा क्रमांक मिळवला.
मुलींच्या गटात सांगलीची श्रेया हिप्परगी सहाव्या क्रमांकावर, तर पुण्याची निहिरा कौल सातव्या क्रमांकावर राहिली. पुण्याची साई पाटील नवव्या स्थानी राहून ७० एलो रेटिंग पॉइंट्स मिळवण्यात यशस्वी झाली. ज्येष्ठ बुद्धिबळ संघटक प्रकाश कुंटे यांनी सर्व खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


