पुणे ः अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धेत पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी जयदीप नीलवर्णा हिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली.
या स्पर्धेत श्रावणीने १६०० मीटर धावणे, ४०० मीटर पोहणे आणि पुन्हा १६०० मीटर धावणे असा आव्हानात्मक क्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. तिच्या सातत्यपूर्ण सराव, फिटनेस आणि तांत्रिक कौशल्यामुळे ती २८ प्रतिभावान स्पर्धकांमध्ये ठळकपणे उठून दिसली. या स्पर्धेत पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
श्रावणी सध्या इयत्ता ११वी (विज्ञान) मध्ये शिक्षण घेत असून ती शार्क अक्वॅटिक क्लब, निळू फुले जलतरण तलाव, घोरपडी पेठ, पुणे येथे राष्ट्रीय प्रशिक्षक सायली ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस आणि राष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद इनामदार यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. तिच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


