मुंबई ः साऊथ कॅनरा, न्यू परशुराम, अमर, शिवशक्ती, गुड मॉर्निग यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागात कुमार गटाची उपांत्यापूर्व फेरी गाठली.
मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानात सुरु असलेल्या कुमारांच्या उप उपांत्यापूर्व फेरीत साऊथ कॅनराने उत्तरार्धात देखील आपला खेळातील जोश कायम राखत शिवमुद्रा प्रतिष्ठानला नमवले.विजयी संघाच्या चिराग लिमकर, हर्षल रांजणे यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला याचे श्रेय जाते.
शिवमुद्रा प्रतिष्ठानकडून आदित्य सिंग, श्रेयश नाईक यांनी कडवी लढत दिली. न्यू परशुराम मंडळाने चूरशीच्या लढतीत अशोक मंडळाला ३६-३४ असे चकवीत आगेकूच केली. पहिल्या डावात १५-१३ अशी आघाडी घेणाऱ्या न्यू परशुरामने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत या विजयावर शिक्कामोर्तब केले. समर्थ कासुर्डे, श्रवण भांडे यांनी न्यू परशुराम कडून, तर यश खेतले, साईराज कदम यांनी अशोक मंडळा कडून चतुरस्त्र खेळ करीत सामन्यातील चुरस कायम राखाली.
काळाचौकीच्या अमर मंडळाने हिंदमाता सेवाचा सहज पराभव केला. दर्शन गुरव, सागर राजपूत यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. हिंदमाताचे प्रथमेश लांबोटे, वैभव शिंदे यांचा प्रतिकार अतिशय दुबळा ठरला. शिवशक्ती मंडळाने साई चौगुले, हेमंत कांबळे, तन्मय खोले यांच्या उत्तम खेळाने एस एस जी फाऊंडेशनला नमवत आपली विजयी घोडदौड कायम राखाली. एस एस जी फाऊंडेशन संघाकडून आदित्य शिंदे, सर्वेश दवणे यांनी कडवी लढत दिली.
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स संघाने श्रीराम क्रीडा विश्वस्थ संघावर विजय मिळविला. दिनेश गवळी, सुजान दळवी यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. श्रीराम संघाकडून कार्तिक शेट्टी, विराज जाधव चमकले.


