राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर ः डेरवण (रत्नागिरी) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगरचा खेळाडू हर्ष प्रमोद पाटील याने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १७ वर्षांखालील गटातील ११० मीटर हर्डल्स या स्पर्धेत त्याने १३.९० सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १०० मीटर धावण्यात १०.९० सेकंदांसह द्वितीय क्रमांक, तर रिले संघ स्पर्धेतही महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळवून दिले.
कालावती चव्हाण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वीचा विद्यार्थी असलेला हर्ष पाटील हा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या पूनम नवगिरे यांचेही सहकार्य लाभत आहे.
त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याची लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. हर्षच्या या यशामुळे संभाजीनगर आणि क्रीडा प्रबोधणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


