छत्रपती संभाजीनगर ः पोलिस मुख्यालयातील देवगिरी स्टेडियम येथे आयोजित ३६ व्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची मोठ्या जल्लोषात सांगता झाली. दिमाखदार सोहळ्यात शहर पोलिस विभागाने जनरल चॅम्पियनशिप जिंकली.
समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र मिश्र यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांतील पोलीस दलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
समारोप सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
समारोप प्रसंगी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक विनय राठोड, पोलीस अधीक्षक नवनीत कांवत (बीड), पोलीस अधीक्षक अजय बन्सल (जालना), पोलीस अधीक्षक रितू खोकर (धाराशिव) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहर विभागाचे सलग दहावे चॅम्पियनशिप विजेतेपद
या वर्षीदेखील छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस विभागाने जनरल चॅम्पियनशिप पटकावून सलग दहाव्या वर्षी आपले वर्चस्व कायम ठेवले. विविध खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शहर विभागाने सर्वाधिक गुण मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेते
सर्वोत्तम पुरुष खेळाडू : बाबासाहेब मंडलीक (छत्रपती संभाजीनगर शहर).
सर्वोत्तम महिला खेळाडू : शिल्पा नाहक (बीड विभाग).
पुरुष गट
हॉकी : छत्रपती संभाजीनगर शहर (प्रथम), धाराशिव (द्वितीय). फुटबॉल : जालना (प्रथम), छत्रपती संभाजीनगर शहर (द्वितीय). हॅण्डबॉल : बीड (प्रथम), छत्रपती संभाजीनगर शहर (द्वितीय). बास्केटबॉल : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (प्रथम), बीड (द्वितीय). कबड्डी : छत्रपती संभाजीनगर शहर (प्रथम), धाराशिव (द्वितीय). खो-खो : बीड (प्रथम), छत्रपती संभाजीनगर शहर (द्वितीय). व्हॉलीबॉल : बीड (प्रथम), छत्रपती संभाजीनगर शहर (द्वितीय).
महिला गट
बास्केटबॉल : छत्रपती संभाजीनगर शहर (प्रथम). कबड्डी : छत्रपती संभाजीनगर शहर (प्रथम). खो-खो : छत्रपती संभाजीनगर शहर(प्रथम). व्हॉलीबॉल : छत्रपती संभाजीनगर शहर (प्रथम).
पोलीस क्रिकेट स्पर्धा विजेते ः पुरुष गटः परीमंडळ–२ (प्रथम), परीमंडळ–२ (द्वितीय). महिला गट ः स्पार्कलिंग स्टार (पोलीस मुख्यालय) – प्रथम, रायझिंग स्टार (द्वितीय).
पथसंचलनात छत्रपती संभाजीनगरचे वर्चस्व
समारोप सोहळ्यात सर्व जिल्ह्यांच्या पथकांनी प्रभावी मार्चपास्ट सादर केला. पथसंचलनाचे नेतृत्व हॉकीपटू आजम शेख यांनी केले. प्रमुख अतिथी रवींद्र मिश्रा यांनी पथकांचे कौतुक करत सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांचे कौतुक करत पुढील महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांमध्येही उत्तम यश मिळवण्याचे आवाहन केले.


