मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बाल दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अहान कातारुका, अनिष्क बियाणी, आहील शेख, शाश्वत कुमार, मनोमय शिंगटे, अथर्व हिरे या खेळाडूंनी सलामीचे सामने जिंकले.
वजिराच्या सहाय्याने सर्वांगसुंदर खेळ करीत अहान कातारुकाने २४ व्या चालीला मिहीत कदमच्या राजाला नमवून पहिला साखळी गुण वसूल केला. क्रीडाप्रेमी क्षितिजा कद्रे, रमेश जोशी, प्रमुख पंच योगेश वेलसकर व अमेय ठुंबरे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.
परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात सुरू झालेल्या एलआयसी-आयडियल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अनिश्क बियाणीने डावाच्या मध्यापर्यंत रंगलेल्या मोहमद अन्सारी विरुद्धच्या सामन्यात २९व्या चालीला विजय मिळविला. अन्य सामन्यात आहील शेखने प्राप्ती पिरकरचा, शाश्वत कुमारने आर्यन भोसलेचा, मनोमय शिंगटेने सार्थक आंग्रेचा, अथर्व हिरेने विराज चौधरीचा, अधवान ओसवाल याने साम्यक कद्रे याचा, साहस जाधवने अयांश बियाणीचा, इशा मंगलपल्लीने शर्विल गोल्हारचा पराभव करून सलामीची साखळी फेरी जिंकली. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे आदी जिल्ह्यातील १२२ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत.


