विजय क्लब, गोलफादेवी, सिद्धिप्रभा, जय भारत ,साऊथ कॅनरा, अमर, शिवनेरी, नवोदित उपांत्य फेरीत

  • By admin
  • November 15, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

मुंबई ः विजय क्लब, गोलफादेवी, सिद्धिप्रभा, जय भारत यांनी पश्चिम, तर साऊथ कॅनरा, अमर, शिवनेरी, नवोदित यांनी पूर्व विभागात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात उपांत्य फेरी गाठली. 

मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या पश्चिम विभागातील कुमारांच्या उपांत्यापूर्व फेरीत विजय क्लब-अ ने चुरशीच्या लढतीत वीर संताजीला २९-२५ पराभूत केले.. शिवम यादव, मनिष वासकर विजयकडून, तर उत्तम सिंग, निशांत चव्हाण वीर संताजी संघाकडून उत्तम खेळले. ओमकार शिंदे, अमोल गायकवाड यांच्या चढाई पकडीच्या खेळाने गोलफादेवी सेवा संघाने एफर्ड्स युनायटेडला नमवत आगेकूच केली. एफर्ड्सचा तन्मय कदम चमकला.

सिद्धिप्रभा फाउंडेशनने सुनील स्पोर्ट्स संघाचा  पाडाव केला. सिद्धेश भोसले, विशाल गाढवे यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सुनीलचा अमेय दळवी बरा खेळला. जय भारतने विजय क्लब – ब संघाचा सहज पाडाव केला तो श्रेयस मटकर, तन्मय बावकर यांच्या आक्रमक खेळाने. विजयचा जयकिसन चव्हाण बरा खेळला.

पूर्व विभागातील कुमारांच्या उपांत्यापूर्व सामन्यात साऊथ कॅनराने यश मंडळावर विजय मिळवला. विश्रांतीला चिराग लिमकर, अभिजित यांच्या आक्रमक खेळाने कॅनरा संघाने १५-८ अशी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर सूर सापडलेल्या श्रवण पवार, अल्केश निचोरे यांनी कडवी लढत देत सामन्याची रंगत वाढविली. पण यश मंडळाला विजय मिळवून देण्यात ते कमनशिबी ठरले. 

काळाचौकीच्या अमर मंडळाने शिवशक्ती मंडळाला ४१-४० असे चकवीत आपली घोडदौड सुरूच ठेवली. पूर्वार्धात २५-१५ अशी आघाडी घेणाऱ्या अमरला उत्तरार्धात विजयासाठी शिवशक्ती संघाने चांगले झुंजविले. शेवटी १ गुणाच्या फरकाने त्यांनी विजयाला गवसणी घातली. साहिल बनगर, सागर राजपूत अमर कडून, तर साई चौगुले,शुभम तळवडे शिवशक्ती कडून उत्कृष्ट खेळले.
 
शिवनेरी सेवा संघाने न्यू परशुराम संघावर मात करीत आपला विजय साकारला. यश चोरगे, नीरज ठोंबरे या विजयाचे शिल्पकार ठरले. न्यू परशुरामच्या समर्थ कासुर्डे, हर्ष चव्हाण यांनी उत्तम लढत दिली. शेवटच्या सामन्यात गुड मॉर्निंगने पूर्वार्धातील १४-२१ अशा ७ गुणांच्या पिछडीवरून नवोदित संघाला ५०-४२ असे नमवीत आगेकूच केली. दिनेश गवळी, अर्चन पवार यांनी विजयी संघाकडून चौफेर खेळ केला. अर्जुन कोकरे, प्रथमेश चव्हाण यांचा जोश उत्तरार्धात कमी पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *