मिनी आयपीएल लिलाव
मुंबई : आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावापूर्वी झालेल्या ट्रान्सफर विंडोमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार असून लखनौने त्याला ३० लाखांना खरेदी केले. एमआयने त्याला शुभेच्छा देत त्याच्या पुढील प्रवासासाठी समर्थन व्यक्त केले.
दरम्यान, लेग-स्पिनर मयंक मार्कंडे पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. मुंबईने त्याची केकेआरकडून ३० लाखांना खरेदी केली. २०१८ मध्ये पदार्पण केलेल्या मार्कंडेने पूर्वीही मुंबईसाठी उल्लेखनीय खेळ केला आहे.
मोठा बदल म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा लखनौ सुपर जायंट्समध्ये समावेश. सनरायझर्स हैदराबादकडून १० कोटींच्या मान्य रकमेत तो लखनौला गेला. त्याचप्रमाणे, अनुभवी फलंदाज नितीश राणा दिल्ली कॅपिटल्सकडे ४.२ कोटींमध्ये दाखल झाला.
डोनोवन फरेरा पुन्हा राजस्थानकडे परतला असून दिल्लीकडून त्याची १ कोटींमध्ये खरेदी झाली. सर्वात मोठा धक्का म्हणजे राजस्थान कर्णधार संजू सॅमसनचा चेन्नई सुपर किंग्समध्ये १८ कोटींमध्ये झालेला समावेश. त्यानंतर सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाही राजस्थानकडे १४ कोटींमध्ये गेला, तर सॅम करनलाही राजस्थानने २.४ कोटींमध्ये घेतले.
या बदलांमुळे आयपीएल २०२६ हंगामात संघरचनेत मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे.



