दक्षिण आफ्रिका संघ पराभवाच्या छायेत

  • By admin
  • November 15, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

दुसऱ्या दिवशी १५ विकेट पडल्या, रवींद्र जडेजाची घातक फिरकी, भारतीय संघाची मजबूत पकड

कोलकाता ः कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. रवींद्र जडेजाच्या (४-२९) घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका संघाची दुसऱ्या डावात सात बाद ९३ अशी बिकट स्थिती झाली आहे. सद्यस्थितीत आफ्रिका संघ ६३ धावांनी आघाडीवर आहे. दोन दिवसांच्या खेळात तब्बल २६ विकेट पडल्या आहेत. दुसऱ्या दिवशी १५ विकेट पडल्या आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव १५९ धावांत गुंडाळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने भारताला पहिल्या डावात १८९ धावांवर रोखले. भारतीय संघ फक्त ३० धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. गोलंदाजांनी भारतीय संघाला १८९ धावांवर रोखून संघाला एक संधी निर्माण करुन दिली. फिरकीपटू सायमन हार्मर (४-३०) याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र, दुसऱ्या डावात देखील दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी गडगडली.

रवींद्र जडेजा (४-२९), कुलदीप यादव (२-१२) व अक्षर पटेल (१-३०) यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर आफ्रिका संघाची दाणादाण उडाली. रायन रिकेलटन (११), मारक्रम (४) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. त्यानंतर एकापाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. मुल्डर (११), टोनी डी झोर्झी (२), ट्रिस्टन स्टब्स (५), काइल व्हेरेन (९), मार्को जॅनसेन (१३) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. कर्णधार टेम्बा बावुमा नाबाद २९ धावांची चिवट खेळी करुन एकाकी झुंज देत आहे. कॉर्बिन बॉश हा एका धावेवर खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने ३५ षटकात सात बाद ९३ धावा काढल्या आहेत.

ईडन गार्डन्सच्या पिचवरून गोलंदाजांना, विशेषतः फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण २६ विकेट्स पडल्या आहेत. तिसऱ्या दिवशी भारताला दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर गुंडाळून विजयासाठी मोठे लक्ष्य ठेवण्यापासून रोखण्याची सुवर्णसंधी आहे. सद्यस्थितीत भारतीय संघाने कसोटीवर भक्कम पकड निर्माण केली आहे.

कर्णधार गिलच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीमुळे भारताची चिंता वाढली आहे. कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलने निवृत्ती घेतली. पहिल्या डावात गिलने तीन चेंडू खेळले पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गिलच्या दुखापतीबद्दल माहिती जाहीर केली. बीसीसीआयने सांगितले की गिलच्या मानेच्या दुखापती आहेत आणि बोर्डाची वैद्यकीय टीम त्याचे मूल्यांकन करत आहे. त्याच्या प्रगतीवरून त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल. गिलने दुसऱ्या दिवशी फलंदाजी केली नाही. तो तिसऱ्या दिवशी मैदानात परतेल की नाही हे पाहणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *