नाशिक ःमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी ऑनलाईन स्टुडन्ट पोर्टलचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ अजय चंदनवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू उपस्थित होते.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ अजय चंदनवाले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी व इतर काही कामासाठी तात्पुरते पदवी प्रमाणपत्रासाठी अधिक काळ थांबावे लागत होते. विद्यापीठाच्या ऑनलाईन पोर्टलमुळे तात्पुरते पदवी प्रमाणपत्र त्वरीत उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन पोर्टलमुळे अधिक सुलभता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना मूळ पदवी प्रमाणपत्र पदवी प्रदान समारंभापर्यंत थांबावे लागत असे मात्र या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू यांनी सांगितले की, सदर स्टुडन्ट पोर्टलद्वारे, विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर होताच, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र रुपये एक हजार मात्र इतके शुल्क भरून उपलब्ध होणार आहे. तसेच या ऑनलाईन पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैशांची बचत होणार आहे. संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय परिषदेकडे नोंदणी करण्यासाठी विद्यापीठामार्फत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यात येतात. सदर तात्पुरते पदवी प्रमाणपत्र प्रचलित नियमानुसार ऑफलाईन पद्धतीने देण्यात येत होते. तात्पुरते पदवी प्रमाणपत्र मिळणेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ लागत होता. परीक्षा विभागात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला असून कामकाजाचे संपूर्ण ऑटोमेशन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रान्सक्रिप्ट देण्यापाठोपाठ तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यापीठातर्फे स्टुडन्ट पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे.
विद्यापीठामार्फत तात्पुरते पदवी प्रमाणपत्राच्या पोर्टलसाठी परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कुलसचिव प्रमोद पाटील व कक्ष अधिकारी रत्नाकर काळे यांनी परिश्रम घेतले.


