रांची ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी कायम ठेवत बिहार संघाचा १५४ धावांनी पराभव केला. या सामन्यात दिग्विजय पाटील (११६) आणि शुभम मैड (३-१७) यांनी शानदार कामगिरी बजावली.
या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद ३१३ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना बिहार संघ ५० षटकात नऊ बाद १५९ धावा काढू शकला. बिहारला तब्बल १५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार दिग्विजय पाटील याने आक्रमक शतक साजरे केले. त्याने ११४ चेंडूंचा सामना करत ११६ धावा फटकावल्या. या शतकी खेळीत त्याने आठ चौकार व तीन षटकार मारले.

या सामन्यात सागर पवार (३४), नीरज जोशी (१४), हर्ष मोगवीरा (३६), साहिल औताडे (३७), किरण चोरमले (१७) यांनी आपले योगदान दिले. अजय बोरुडे याने २४ चेंडूत नाबाद ४२ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. बिहार संघाकडून बादल कनुजिया याने ५१ धावांत तीन गडी बाद केले.
बिहार संघासमोर विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना बिहार संघ ५० षटकात नऊ बाद १५९ धावा काढू शकला. आकाश राज याने सर्वाधिक ५५ धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला.
महाराष्ट्र संघाकडून शुभम मैड याने प्रभावी गोलंदाजी करत १७ धावांत तीन विकेट घेतल्या. किरण चोरमले याने ३४ धावांत दोन गडी बाद केले. वैभव दारकुंडे (१-१८), प्रथमेश गावडे (१-२१), नीरज जोशी (१-२२) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.



