जालना ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १४ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत जालना आणि चंद्रोस यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात जालना संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली होती.
पुणे येथील विराग क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात चंद्रोस संघाने पहिल्या डावात ६४.२ षटकात सर्वबाद २१८ आणि दुसऱया डावात ३९ षटकात पाच बाद १९१ धावसंख्या उभारली. जालना संघाने पहिल्या डावात ९० षटके फलंदाजी करत नऊ बाद २३३ धावा फटकावत पहिल्या डावात आघाडी घेतली होती.

या सामन्यात आर्यन बारगळे याने १०४ धावांची दमदार शतकी खेळी साकारली. त्याने १५ चौकार मारले. आर्यन बारगळे याने दुसऱया डावात ९४ चेंडूत ८९ धावा फटकावत सामना गाजवला. विश्वरुप उपाध्याय याने १३ चौकारांसह ८७ धावा काढल्या. त्याने तब्बल २२७ चेंडूंचा सामना केला.
गोलंदाजीत पृथ्वी पाळणे याने ४४ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. दर्श चानपूर याने ४७ धावांत तीन गडी बाद केले. सार्थ बदाडे याने ३२ धावांत दोन बळी घेतले. जालना क्रिकेट संघास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


