मुंबई ः विजय क्लब, सिद्धी प्रभा यांनी पश्चिम, तर साऊथ कॅनरा, गुड मॉर्निंग यांनी पूर्व विभागात मुंबई शहर कबड्डी असोसिएशएनने आयोजित केलेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात अंतिम फेरी गाठली.
मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या पश्चिम विभागातील कुमारांच्या उपांत्या फेरीत विजय क्लब-अ संघाने चुरशीच्या लढतीत गोलफादेवीला २९-२६ असे पराभूत केले. आर्यन शर्मा, प्रिन्स मायकल, मनीष वासकर विजयकडून, तर पंकज घाडी, करण गुड्डीत गोलफादेवी संघाकडून उत्तम खेळले. सिद्धिप्रभा फाऊंडेशनने जय भारतचा सहज पाडाव केला. पूर्वार्धात एकमेकांचा अंदाज घेत दोन्ही संघानी सावध खेळ केल्यामुळे २३-२२ अशी सिद्धिप्रभा संघाकडे आघाडी होती. सिद्धेश भोसले, विशाल घाडी, वेदांत पवार यांच्या उत्तरार्धातील झंझावाती खेळाने त्यांनी गुणांचे अर्धशतक पार करीत मोठा विजय मिळवला. जय भारतच्या अथर्व कदम, आर्यन बावडेकर यांचा खेळ उत्तरार्धात अगदीच ढेपळाला.
पूर्व विभागातील कुमारांच्या उपांत्य सामन्यात पहिल्या डावातील १६-२१ अशा पिछाडीवरून साऊथ कॅनराने चुरशीच्या लढतीत काळाचौकीच्या अमर मंडळाला वर ४४-३८ असा विजय मिळविला. विश्रांतीनंतर सूर सापडलेल्या चिराग लिमकर, गुरुप्रसाद पंडित यांनी कडवी लढत देत सामना साऊथ कॅनराच्या बाजूने झुकवीला. रमेश रासकर,साहिल बनगर यांचा पहिल्या डावातील खेळ दुसऱ्या डावात बहारला नाही. शेवटच्या सामन्यात गुड मॉर्निंगने शिवनेरी सेवाला ४३-२४ असे नमवीत अंतिम फेरी गाठली. दिनेश गवळी, सक्षम सूर्यवंशी, श्रवण तिरोडकर यांनी विजयी संघाकडून चौफेर खेळ केला. शिवनेरीचे यश चोरगे, आर्यन सुहास चमकले.
कुमारी गटाच्या पूर्व विभागात श्री स्वामी समर्थ मंडळाने शताब्दी स्पोर्ट्स संघाचा, जिजामाता महिला संघाने महर्षी दयानंदचा, तर डॉ शिरोडकरने वीर स्पोर्ट्स संघाचा असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. कुमारी गटाच्या पश्चिम विभागात शिवशक्ती महिला अ संघाने अंकुर स्पोर्ट्सचा, भारतमाता स्पोर्ट्सने गोलफादेवी प्रतिष्ठानचा, अमरहिंद मंडळाने चंद्रोदय मंडळाचा तर शिवशक्ती महिला ब संघाने विश्वशांती मंडळाचा पराभव केला.


