दोन्ही संघ धावांचे द्विशतक गाठू शकले नाहीत
कोलकाता ः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा ३० धावांनी दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिका आणि भारतीय अशा दोन्ही संघांची फलंदाजी कामगिरी अत्यंत खराब होती. या सामन्याच्या कोणत्याही डावात धावसंख्या २०० पर्यंत पोहोचली नाही, ही ६६ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेली कामगिरी आहे.
१९५९ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्याच्या चारही डावात २०० पेक्षा कमी धावसंख्या उभारण्यात आली आहे. यापूर्वी अशी घटना १९५९ मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यात घडली होती. त्या कसोटी सामन्यातही चारही डावांत एकही धावसंख्या २०० पर्यंत पोहोचली नाही. कोलकात्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात हे दृश्य पाहायला मिळाले.
भारतीय संघ घरच्या मैदानावर इतिहासातील सर्वात कमी लक्ष्याचा (१२४ धावा) पाठलाग करण्यात अपयशी ठरला. यापूर्वी, २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे येथे झालेल्या कसोटीत भारताला १४७ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. भारताने तो सामना २५ धावांनी गमावला. २१ व्या शतकात असे दोन वेळा घडले आहेत जेव्हा भारत घरच्या मैदानावर १५० पेक्षा कमी धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला आहे. २०२४ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघ २३१ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. त्यावेळी यजमान संघाचा २८ धावांनी पराभव झाला.
फलंदाजांची निराशा
१२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडियाने त्यांचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जयस्वाल (०) आणि केएल राहुल (१) पहिल्या दोन षटकात गमावले. सुंदरने ध्रुव जुरेल (१३) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावा जोडल्या. ध्रुव जुरेल बाद झाल्यानंतर, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने फक्त दोन धावा केल्या. सुंदरने रवींद्र जडेजा (१८) सोबत पाचव्या विकेटसाठी २६ धावा जोडल्या. सुंदर ३१ व्या षटकात बाद झाला. अक्षर पटेलने मोठे फटके मारून धावा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने १७ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. भारताचा अखेर पराभव झाला.



