बीड ः इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी कार्तिकी संदीप मिसाळ आणि जालंधर (पंजाब) मध्ये होणाऱ्या आठव्या राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी समर्थ सचिन आंधळे या दोन बीडच्या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धापूर्व सराव शिबीर वर्धा जिल्हा क्रीडा कार्यालय येथे होणार आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे.

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ६९ वी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. १७ वर्षे वयोगटात होणाऱ्या या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी कार्तिकी मिसाळची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच जालंधर (पंजाब) येथे २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी १४ वर्षे वयोगटात समर्थ आंधळे याची महाराष्ट्र राज्य तायक्वांदो संघात निवड झाली आहे. त्याने शिर्डी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत ४१ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले आहे.
या राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेत कल्याणी घुगे (रौप्यपदक), सार्थक ठेंगल व अक्षदा तांदळे (कांस्य पदक) यांनीही चांगली कामगिरी नोंदवली. हे दोन्ही खेळाडू बीड जिल्हा क्रीडा संकुलातील डॉ अविनाश बारगजे यांच्या चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमीचे नियमित खेळाडू आहेत. राज्य स्पर्धेसाठी शेख अनिस, ऋत्विक तांदळे, देवेंद्र जोशी, बाळासाहेब आंधळे यांनी संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.


