वांगणी ः महाराष्ट्रातील वांगणी – बदलापूर परिसराच्या जवळ असलेल्या चंदेरी किल्ल्यावर चढाईदरम्यान अवघड भागात घसरलेल्या एका ट्रेकरचा शनिवारी गिर्यारोहकांच्या संघाने थरारक पद्धतीने बचाव केला. सुमारे ७०० मीटर उंचीचा आणि अवघड दर्जाचा मानला जाणारा हा ट्रेक करण्यासाठी अनुभव आवश्यक आहे.
मिहीर जाधव, हेमंत जाधव, गुरु, विशाल गोदडे, रवी पवार, रवी पाटील, रुद्र मोहापात्रा, वंगेश गायकवाड आणि गणेश हा गिर्यारोहकांचा गट गिरिप्रेमी पुणे तर्फे २०२६ मध्ये होणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेच्या सरावासाठी चंदेरी किल्ल्यावर आला होता.
त्याचवेळी दुसऱ्या एका गटातील ट्रेकर्सही चंदेरी ट्रेकसाठी आले होते. त्यांच्यातील एक ट्रेकर चढाई दरम्यान एका अवघड ठिकाणी घसरून अडकला.त्यांच्यातील काही सदस्यांनी धाव घेऊन मिहीरच्या टीमकडे मदत मागितली. एका सदस्याचा तोल जाऊन एका तांत्रिक अडचणीं च्या भागात खाली घसरल्याची माहिती त्यांनी दिली.
ही माहिती मिळताच मिहीरने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कृती केली आणि आपला संघ घेऊन घटनास्थळी रवाना झाला. तेथे गेल्यावर ट्रेकर सुमारे १५० मीटर खोल दरीच्या काठावर केवळ गवताला धरून लोंबकळत असल्याचे दिसले.
मिहीरने तातडीने दोर दगडाला अडकवून रॅपलिंग करून खाली उतरत त्या ट्रेकरला सुरक्षितपणे बांधले. वर असलेल्या रवी पवार आणि रुद्र मोहापात्रा यांनी डिसेंडरच्या साहाय्याने त्याला वर खेचून सुरक्षित स्थळी आणले.
या संयुक्त आणि त्वरित केलेल्या प्रयत्नांमुळे ट्रेकरचा यशस्वी बचाव करण्यात आला. सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. मिहिर याने दाखवलेले प्रसंगवधान आणि केलेल्या मदतीमुळे अभय पांडे यांचे प्राण वाचले.
घटनेनंतर मिहीरच्या टीमने अशा अवघड आणि तांत्रिक चढाई करताना प्रशिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचे, तसेच योग्य सुरक्षा साहित्य बाळगण्याचे आवाहन केले. मिहिर आणि त्याची टीम एमएमआरसीसी या ते बचाव पथकात कार्यरत आहेत.


