शालेय कबड्डी स्पर्धेत दादरच्या अँटोनी डिसिल्वा हायस्कूलला दुहेरी मुकुट

  • By admin
  • November 17, 2025
  • 0
  • 46 Views
Spread the love

मुंबई ः मुंबई शालेय क्रीडा असोसिएशन आयोजित ८३ व्या आंतर शालेय कबड्डी स्पर्धेत दादरच्या डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूलने दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. त्यांनी मुलांच्या १४ आणि १६ वर्षांखालील गटात बाजी मारली. तर मुलींच्या १६ वर्षांखालील गटात विक्रोळीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अ विद्यालय संघाने विजेतेपदाचा मान मिळवला. 

या स्पर्धेत ३६ शालेय संघांनी भाग घेतला होता. आझाद मैदान येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या अ संघाने मुलींच्या १६ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकावले. १६ वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात विक्रोळीच्या डॉ आंबेडकर विद्यालयाच्या अ संघाने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद शाळेचा २७ गुणांनी दणदणीत पराभव केला. विजयी संघाच्या पायल कांचन व काव्या परब यांनी शानदार चढाया केल्या. त्यांना ईशा दिघेच्या सुरेख पकडीची साथ मिळाली. पराभूत संघाच्या आर्या जाधवची लढत एकाकी ठरली. श्रावणी पवारचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला.

१६ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळवताना डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल दादरने सेंट इग्नाटियस शाळा, जेकब सर्कलचा ४९-१८ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या तनिष पंगम व हर्ष बेस्केने चढाईत आपल्या खेळाची शानदार छाप पाडली. त्यांना विहंग गोठनकरने सफाईदार पकडी करून चांगली साथ दिली.

१४ वर्षाखालील गटात मुलांच्या अंतिम सामन्यात डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूलने स्वामी विवेकानंद शाळा चेंबूरचा ५०-२८ गुणांनी आरामात पराभव केला. या विजया बरोबरच डिसिल्वाने आपल्या गेल्या वर्षीच्या पराभवाची परतफेड केली. नील भालेराव व श्रणय लोळे डिसिल्वा संघाच्या विजयाचे शिल्पकार होते. पराभूत संघाच्या मयांक गायकवाडची लढत एकाकी ठरली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

शिक्षण तज्ञ नमिता सिन्हा, शालेय संघटनेचे अध्यक्ष फादर ज्युड रॉड्रिग्ज, सचिव एझमेरो फिग्रेडो, ड्रीम स्पोर्ट्स वरिष्ठ व्यवस्थापक निमिषा, कार्यकारिणी सदस्य राजाराम पवार, राम अहिवले यांच्या हस्ते संपन्न झाला. एम एस एस एस भारतीय खेल, सचिव डॉ दीपक शिंदे, खेल उपसमिती सदस्य रवींद्र विसपुते, संजय घोडके यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.

स्पर्धेचा अंतिम निकाल
 १६ वयोगट मुले (डॉ व्ही डी घटे चॅलेंज शिल्ड) ः १. डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, दादर, २. सेंट इग्नाटियस हायस्कूल, जेकब सर्कल, ३. स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर.

१६ वयोगट मुली (श्रीमती सरस्वतीबाई मंत्री शिल्ड) ः १. डॉ आंबेडकर विद्यालय, “अ”, विक्रोळी, २. स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर, ३. डॉ आंबेडकर विद्यालय, “ब”, विक्रोळी.

१४ वयोगट मुले (श्री बालमोहन शिल्ड) ः १. डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, दादर, २. स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर, ३. सेंट ऍनस हायस्कूल ओरलेम , मालाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *