जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद
छत्रपती संभाजीनगर ः “माझी शाळा माझे उपक्रम, ‘अधिकारी आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर पोलीस उपविभागीय अधिकारी (गृह) गौतम पातारे यांनी जिल्हा परिषद कन्या प्रशाला औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला.
गौतम पातारे यांनी आपल्या संवादात मुलांनी सोशल मीडियाचा वापर न करता जास्तीत जास्त आई-वडील, मित्र यांच्याशी संवाद साधावा, शिस्त, प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, अभ्यासात नियमितता ठेवणे, अवांतर वाचन करणे, मनातल्या भितीदाय गोष्टी शिक्षकांना सांगा, कायद्याचे महत्व तसेच सायबर गुन्हे प्रतिबंध, पोलिस विभागाचे कार्य, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका, तसेच समाजात सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली.
पुढे बोलताना गौतम पातारे म्हणाले की, सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, अनोळखी व्यक्तींकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि सुरक्षित इंटरनेट वापराचे मार्गदर्शन त्यांनी दिले. ‘पोलिस माझा मित्र’ ही संकल्पना समजावून सांगत, प्रत्येक वेळी स्वत:ला आय एम द बेस्ट हा विचार घेऊन सतत अभ्यास करा, अभ्यासाबरोबर चांगले संस्कार जोपासण्याचे आवाहन केले.लहानपणीच चांगल्या सवयी अंगी बाणवून जबाबदार नागरिक होणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी साध्या व परिणामकारक भाषेत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले त्या प्रश्नांना गौतम पातारे यांनी सोप्या भाषेत उत्तर देत संवाद अधिक रंजक करीत मनमोकळी उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) निता श्रीश्रीमाळ या होत्या. त्यांनी विद्यार्थी यांनी वेळ ओळखून आपले कसब पणाला लावले पाहिजे, अभ्यासासोबत खेळ खेळणेही अत्यंत महत्वाचे आहे असे नमुद करून माजी विद्यार्थी यांनीही प्रशालेच्या विकासासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक व परिचय प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा कोळी यांनी केले. प्रशालेच्या शालेय समिती, शिक्षण तज्ञ ललिता मगरे यांनी आभार मानले.
या कार्याक्रमासाठी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी/शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव गायकवाड, चेतना तायडे, सीमा बेगम, आयेशा बेगम, ज्योती पवार, विलास क्षीरसागर, संपदा शिंदे, तुषार चव्हाण, गजानन डफळ, स्वप्नील लोखंडे यांनी परिश्रम घेतले.


