एन पी स्पोर्ट्स, ज्योती स्पोर्ट्स, शिवनेरी मंडळ चौथ्या फेरीत
मुंबई ः महात्मा गांधी स्पोर्ट्स, संघर्ष मंडळ यांनी मुंबई उपनगर पश्चिम विभाग महिलांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. एन पी स्पोर्ट्स, जॉली स्पोर्ट्स, शिवनेरी मंडळ यांनी पश्चिम विभाग द्वितीय श्रेणी पुरुषांची चौथी फेरी गाठली.
गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्टस् अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील प्ले-ग्राउंडवर हे सामने सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत महात्मा गांधी स्पोर्ट्स संघाने माऊली प्रतिष्ठानला सहज नमवत उपांत्य फेरी गाठली. करिना कामतेकर, तृप्ती सोनावणे यांच्या उत्कृष्ट खेळीला याचे श्रेय जाते. दुसऱ्या सामन्यात संघर्ष मंडळाने प्रणाली नागदेवते, पायला गोळे यांच्या चतुरस्त्र खेळाने जगदंब मंडळाचा पाडाव केला. जगदंब संघाची सानिका पाटील चमकली.
याच विभागात द्वितीय श्रेणी गटाच्या सामन्यात एन पी स्पोर्ट्स संघाने गावादेवी मंडळावर मात केली. सुजल परब, सुधांशु एन पी स्पोर्ट्स संघाकडून, तर प्रसन्न बिराडी गावादेवी संघाकडून उत्तम खेळले. जॉली स्पोर्ट्स संघाने साई मंडळावर विजय मिळविला. गौरव इंगळे जॉली संघाकडून, तर प्रथमेश कुंभार गावादेवी संघाकडून उत्तम खेळले. शिवनेरी संघाने धनुष्य शेट्टी, प्रथमेश जावळे यांच्या चढाई पकडीच्या खेळाने शंभूराजे मंडळाचा पाडाव केला. शंभूराजे मंडळाचा जयेश शेट्टी चमकला.


