कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद, व्हॉलिबॉल स्पर्धेत उपविजेतेपद, रिले प्रकारात सुवर्ण
नाशिक (विलास गायकवाड) ः आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा करंजी आश्रम शाळा येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बोपेगावच्या खेळाडूंनी १४ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच रिले प्रकारात प्रथम क्रमांक व १७ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघामध्ये उपविजेतेपद मिळवले. खेळाडूंच्या या शानदार कामगिरीचे प्रचंड कौतुक होत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी एस सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेबद्दल माहिती व मार्गदर्शन केले. या स्पर्धेत एकूण शासकीय व अनुदानित १७ शाळांनी सहभाग नोंदवला होता. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धा, व्हॉलीबॉल, हँडबॉल, खो-खो, कबड्डी या पाच खेळांचा समावेश होता.
या तालुकास्तरीय १४ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना बोपेगाव आश्रम शाळा आणि पिंपरखेड आश्रम शाळा यांच्यात झाला. त्यात बोपेगाव शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करीत विजेतेपद मिळवले. पिंपरखेड आश्रम शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच सतरा वर्षांखालील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये बोपेगाव आश्रम शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला.
तसेच १×१०० रिले मध्ये विक्रम भरत राथड, गणेश अशोक धुळे, नरेंद्र सुभाष गारे, ज्ञानेश्वर विष्णू जाधव यांची जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र कोतकर, जगन्नाथ रंधवे, गोरखनाथ देशमुख, विजेंद्र पाटील, सुनील भागवत, सुलभा अहिरे, प्रतीक्षा पवार, जयमाला भामरे, आशा डोखे, सीताबाई हडस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे.


