खुलदाबाद ः येथील अल इरफान स्कूल शाळेचा कुशल धावपटू अब्दुल सैहान खान याने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्र अंडर-१४ अॅथलेटिक्स ४×१०० मीटर रिले संघात स्थान मिळवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्य संघासाठी आपली निवड पक्की केली.
अब्दुल सैहान आता १ ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान इंदौर (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या स्कूल नॅशनल अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेपुर्वी २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अब्दुल सैहानच्या या यशामध्ये प्रशिक्षक कुरेशी मोहम्मद अख्तर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेचे अध्यक्ष मुजतबा फारूक, सचिव सय्यद वसीमुद्दीन नेहरी, प्राचार्य खालिद काझी, उपप्राचार्य तसेच शाळेचे क्रीडा प्रशिक्षक यांनी अब्दुल सैहान व कोच कुरेशी मोहम्मद अख्तर यांचे अभिनंदन केले.
त्यांनी सैहानच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि क्रीडाभावनेचे कौतुक करत राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अब्दुल सैहानची निवड ही अल इरफान स्कूल तसेच खुलदाबाद शहरवासिया साठी अभिमानाची बाब ठरली आहे.


