मुंबई ः मतासफा इस्वातीनी (साउथ आफ्रिकेचा पुढे देश आहे) येथील इसीबयेनी रीसॅाट येथे नुकत्याच झालेल्या १५४ व्या आंतरराष्ट्रीय क्यूरोगी व पॅरा तायक्वांदो पंच परीक्षेत भारतातून एकमेव रायगड व नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.
या आंतरराष्ट्रीय परीक्षा सेमिनार मधून सुभाष पाटील यांना पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धाचे नवीन नियम व पॅरा (अंपगांची स्पर्धा) कशा पद्धतीने घेतात त्याचे नियम शिकवण्यात आले. या पंच परीक्षेत सुभाष पाटील यांची लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, शारीरिक परीक्षा व पॅाइंट कशा प्रकारे द्यायचे या चाचण्या घेण्यात आल्या.
या सर्व चाचण्यांमध्ये सुभाष पाटील यांनी आंतरराष्ट्रीय सेमिनार (नवीन नियम) व पंच परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून पंच परीक्षा उत्तीर्ण झाले. सुभाष पाटील यांना इटली देशातील पंच परीक्षक ब्रुनो ब्रुगाननो व वर्ल्ड तायक्वांदो पॅरा आंतरराष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष उस्मान दिलदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सुभाष पाटील यांनी अनेक देशात जाऊन आंतरराष्ट्रीय रीफ्रेशर पंच परीक्षा दिल्या व अनेक देशात जागतिक तायक्वांदो स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. सुभाष पाटील हे सर्व नियम भारतातील पंचांना शिकवून भारतामध्ये चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सुभाष पाटील यांनी मिळविलेल्या या यशासाठी तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व रायगडचे पदाधिकारी व इतर मान्यवर,सर्व प्राचार्य यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


