
विजय हजारे ट्रॉफी : ओम भोसलेची नाबाद ९४ धावांची तुफानी खेळी
मुंबई : सलामीवीर ओम भोसले याच्या नाबाद ९४ धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर महाराष्ट्र संघाने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सिक्कीम संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या स्पर्धेतील महाराष्ट्र संघाचा हा सलग पाचवा विजय आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सिक्कीम संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात आठ बाद २३४ धावसंख्या उभारली. सिक्कीम संघाकडून पार्थ पलावत याने सर्वाधिक ६४ धावा फटकावल्या. पार्थने ७० चेंडूत ६४ धावा काढताना एक षटकार व पाच चौकार मारले. अंकुल मलिक याने ४० चेंडूत नाबाद ४० धावांची आक्रमक खेळी करत डावाला आकार दिला. त्याने पाच चौकार लगावले. अरुण छेत्री (२५), आशिष थापा (२९), ली योंग लेपचा (२१), निलेश लामिछाने (१४) यांनी आपापले योगदान दिले.
महाराष्ट्र संघाकडून प्रदीप दधे याने प्रभावी मारा करत ४५ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. राजवर्धन हंगरगेकर (१-३३), हितेश वाळुंज (१-३२), सिद्धेश वीर (१-१८), अजीम काझी (१-४७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करुन प्रदीला सुरेख साथ दिली.
महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी २३५ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाने ३४ षटकात दोन बाद २३८ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला.
महाराष्ट्र संघाच्या दणदणीत विजयाचा हिरो ठरला सलामीवीर ओम भोसले. ओम भोसले याने १०१ चेंडूत नाबाद ९४ धावांची वादळी खेळी केली. ओमने या तुफानी खेळीत दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. राहुल त्रिपाठी दोन चौकारांसह २१ धावा काढून लवकर बाद झाला. त्यानंतर ओम भोसले व सिद्धेश वीर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. सिद्धेश वीर याने ४९ चेंडूत ६४ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. त्याने तीन टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. निखिल नाईक व ओम भोसले या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद नाबाद ८२ धावांची भागीदारी करुन संघाला मोठा विजय मिळवून दिला. निखिल नाईक याने २५ चेंडूत नाबाद ४६ धावा फटकावल्या. निखिलने तीन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. महाराष्ट्र संघाने ३४ षटकात दोन बाद २३८ धावा फटकावत या स्पर्धेतील सलग पाचवा विजय साकारला. सिक्कीम संघाकडून रोनित मोरे (१-४२), सप्तुल्ला (१-४३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.