
१३ जानेवारीपासून प्रारंभ; पुरूष गटात २० तर महिलांच्या गटात १९ संघांचा समावेश
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला मऱ्हाटमोळ्या खो-खो खेळाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून खो-खो खेळाचा पहिला वहिला वर्ल्ड कप येत्या १३ ते १९ जानेवारी या कालावधीत नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत पुरूष गटात २० तर महिला गटात १९ देशांचे संघ आपले कौशल्य दाखवतील.
गेल्या चार दशकांपासून खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राज्यातील खो-खोप्रेमी मेहनत घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून खो-खोच्या लीग नंतर आता खो-खोच्या वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पुरुषांप्रमाणे महिलांचाही वर्ल्ड कप आयोजित केला जाणार असून दोन्ही प्रकारात संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. पुरूष गटात भारताचा संघ अ गटात खेळत असून या गटात नेपाळ संघासह पेरू, ब्राझील, भूतान या संघांनाही स्थान देण्यात आले आहे. महिलांच्या गटात भारतासह इराण, मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे संघ खेळणार आहेत.
भारतीय संघाची सलामी ब्राझीलशी
पुरूष गटात भारतीय संघाचा सलामीचा सामना १४ जानेवारीला ब्राझील संघाशी होणार आहे. त्यानंतर १५ जानेवारीला भारतीय संघ पेरूविरुद्ध तर १६ जानेवारीला भूतानविरुद्ध भारतीय संघ भिडेल. महिलांच्या गटात भारतीय महिला संघ १५ जानेवारीला इराण आणि १६ जानेवारीला मलेशिया संघाविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेच्या प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने १७ जानेवारीला, १८ जानेवारीला उपांत्य फेरीच्या लढती खेळविल्या जातील आणि १९ जानेवारीला अंतिम सामना खेळला जाईल, अशी माहिती वर्ल्ड कप आयोजन समितीचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी दिली.
खो-खो विश्वचषकाची गटवारी (पुरूष)
अ गट : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट : दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
क गट : बांगलादेश, श्रीलंका, द. कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट : इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया.
खो-खो विश्वचषकाची गटवारी (महिला)
अ गट : भारत, मलेशिया, इराण, दक्षिण कोरिया.
ब गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स.
क गट : नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट : दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया