

अंतिम सामन्यात केरळ संघावर १-० ने विजय
हैदराबाद : पश्चिम बंगाल संघाने केरळ संघाचा १-० असा पराभव करुन संतोष ट्रॉफी जिंकली. पश्चिम बंगाल संघाचे हे ३३वे विजेतेपद आहे.
जीएमसी बालयोगी अॅथलेटिक्स स्टेडियमवर संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात दुसऱ्या हाफच्या अतिरिक्त वेळेत पश्चिम बंगालच्या रोबी हंसदा याने सामन्यातील एकमेव गोल केला. हंसदा याचा गोल निर्णायक ठरला. आदित्य थापाने दिलेल्या पासवर हंसदा याने अप्रतिम गोल करुन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
या स्पर्धेत पश्चिम बंगाल व केरळ या दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी नोंदवली आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या १० सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित ठेवला होता. अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल संघाने वर्चस्व गाजवले. अलीकडच्या काळात मात्र, सात वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या केरळ संघाने त्यांच्या पूर्वेकडील प्रतिस्पर्धी संघावर बाजी मारली आहे. पश्चिम बंगाल संघाचा अंतिम सामन्यात पराभव करुन केरळने २०१७-१८ व २०२१-२२ मध्ये विजेतेपद पटकावले होते. पश्चिम बंगाल संघाने या पराभवाचा बदला घेत एकमेव गोलच्या जोरावर विजेतेपद पटकावले.