
विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटींचा घोटाळा, मैत्रीणसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेला छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील २१ कोटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्ष गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली येथून पळून जाताना पोलिसांनी त्याला पकडले आहे. मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आल्याने आता या प्रकरणाचे सर्व धागेदोरे उघडण्यास सुरुवात होईल.
विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला गुरुवारी दिल्लीत अटक करण्यात आली आहे. हर्षकुमार याने क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो ११ दिवसांपासून फरार होता. अखेर त्याला दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घोटाळ्यातील हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकरला देखील पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आता हर्षकुमारच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. हर्षकुमारच्या आई-वडिलांना कर्नाटकच्या मुरुडेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
हर्षकुमार क्षीरसागर हा विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर कार्यरत होता. त्याचा पगार महिन्याला १३ हजार रुपये होता. मात्र, त्याने तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांचा घोटाळा केला. त्याने विभागीय क्रीडा संकुलच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये त्याच्या दोन बँक खात्यांवर ट्रान्सफर केले होते. त्यानंतर त्याने ही रक्कम पंधरा पेक्षा अधिक खात्यांवर ट्रान्सफर केली व खर्च देखील केले. यासाठी त्याने यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याची मदत देखील घेतली. वर्षभरातच हर्षकुमारचे ही लुबाडणूक समोर आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो फरार झाला होता.
हर्षकुमार क्षीरसागरकडे १.३५ कोटींची बीएमडब्ल्यू कार, १.२० कोटी रुपयांचे वडिलांचे ४ फ्लॅट, १ कोटींचे घरात इंटिरियरचे काम केले, चीनमधून ५० लाखांची खरेदी केली, ४० लाखांच्या दोन स्कोडा कार, ३२ लाखांची बीएमडब्ल्यू बाईक आणि खात्यात ३ कोटींची रक्कम एवढी मालमत्ता सापडली.
तसेच हर्षकुमारच्या मैत्रिणिकडे देखील कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे. अर्पिताकडे चिखलठाणा भागात १.३५ कोटींचा फ्लॅट, मुंबईत १.०५ कोटींचा फ्लॅट, १.४४ लाखांचा आयफोन, १५ लाखांची स्कोडा गाडी, १.०९ लाखांचा स्मार्टफोन आणि ३ बँक खात्यांमध्ये १ कोटी १ लाख रुपये सापडले आहेत.