
अंडर ९ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा
पुणे : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित व जागतिक बुद्धिबळ महासंघ, भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या ३७व्या नऊ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात तेलंगणाच्या निधिश श्यामल आणि मुलींच्या गटात राजस्थानच्या कियाना परिहार यांनी विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अकराव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत राजस्थानच्या कियाना परिहारने गुजरातच्या आश्वी सिंगचा पराभव करून १० गुणांसह विजेतेपद पटकावले. कियाना हिने इंडियन पद्धतीने डावास सुरुवात करताना ६६ चालींमध्ये आश्वी सिंगवर विजय मिळवला. कियाना ही एमडीएस सिनियर सेकंडरी शाळेत चौथी इयत्तेत शिकत आहे. याआधी तिने २०२३ मध्ये यूएई येथील आशियाई युथ स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
केरळच्या दिवी बिजेश याने आंध्र प्रदेशच्या अनन्या चिंताचा पराभव करून ९.5. गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. दिल्लीच्या वंशिका रावतने तामिळनाडूच्या मार्कसिम श्रीयुक्ताचा पराभव करून ९ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.
खुल्या गटात तेलंगणाच्या निधिश श्यामल याने पश्चिम बंगालच्या ओशिक मोंडलचा पराभव करून ९.५ गुण (८०.५ बुकोल्स सरासरी) मिळवले व प्रथम क्रमांक पटकावला. निधिशने क्वीन्स इंडियन पद्धतीने आपल्या डावास सुरुवात केली व ६३ चालींमध्ये ओशिकवर मात केली. निधिश हा एडीफाय शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून मॅस्ट्रो चेस अकादमीत प्रशिक्षक अमित पाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याआधी २०२२ मध्ये त्याने अहमदाबाद येथील ७ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. पहिल्या पटावरील सामन्यात दिल्लीच्या आरित कपिलने तामिळनाडूच्या थविश एस याला बरोबरीत रोखले व ९.५ (७९.५ बुकोल्स सरासरी) गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. तेलंगणाच्या दिविथ रेड्डी आदुल्ला याने कर्नाटकच्या अयान फुटाणेचा पराभव केला व ९ गुणांसह तिसरे स्थान निश्चित केले.
पारितोषिक वितरण
स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या निधिश श्यामल याला करंडक व ५० हजार रुपये तर उपविजेत्या आरित कपिलला करंडक व ३६ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. मुलींच्या गटातील विजेत्या कियान्ना परिहारला करंडक व ५० हजार रुपये, तर उपविजेत्या दिवी बिजेशला करंडक व ३६ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, एआयसीएफचे सहसचिव मनिष कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे मानद सचिव निरंजन गोडबोले, एमसीएचे खजिनदार विलास म्हात्रे, सकाळ ग्रुपचे हेमंत वंदेकर, चीफ आर्बिटर मंजुनाथ एम, डेप्युटी चीफ आर्बिटर अथर्व गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.