
ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखले, भारताची १४५ धावांची आघाडी
सिडनी : सिडनी कसोटीत दुसऱ्या दिवशीचा खेळ रोमांचक झाला. दुसऱ्या दिवशी एकूण ३१३ धावा निघाल्या आणि १५ विकेट पडल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला १८१ धावांवर रोखून चार धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात भारताने सहा बाद १४१ धावा काढल्या आहेत. सद्यस्थितीत भारतीय संघाकडे १४५ धावांची आघाडी आहे. सिडनी मैदानावर दोनशेपेक्षा अधिक धावांचा पाठलाग चौथ्या डावात करणे एवढे सोपे नाही. त्यामुळे भारतीय संघ दोनशे धावांचा टप्पा गाठण्याचा रविवारी कसोशीने प्रयत्न करणार हे निश्चित. ऋषभ पंतची धमाकेदार फलंदाजी लक्षवेधक ठरली तर बोलंडचा भेदक मारा भारतीय संघासाठी मोठा अडचणीचा ठरला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे चार धावांची आघाडी होती. अशा स्थितीत भारतीय संघाची एकूण आघाडी १४५ धावांची झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला.
सिडनी लक्ष्य पाठलाग आकडेवारी
दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रवींद्र जडेजा आठ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर नाबाद आहे. 200 धावांचा टप्पा गाठण्यासाठी भारतीय संघाचे लक्ष असेल, कारण सिडनीमध्ये २००+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नव्हते. 2000 पासून, संघांनी सिडनीमध्ये 12 वेळा 200+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे. यापैकी केवळ एकदाच पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. पाठलाग करणाऱ्या संघाला सात वेळा पराभवाला सामोरे जावे लागले, तर चार सामने अनिर्णित राहिले. 2006 साली ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 287 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.

भारताचा दुसरा डाव
दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली होती. राहुल (१३) व यशस्वी (२२) यांना बोलंडने बाद करुन भारताला मोठा धक्का दिला. शुभमन गिल १३ धावा करून वेबस्टारचा बळी ठरला. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्याला सहा धावा करता आल्या. बोलंडने पुन्हा एकदा कोहलीची शिकार केली. ऋषभ पंतने ३३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६१ धावांची धाडसी खेळी केली. त्याचवेळी नितीश रेड्डी सलग तिसऱ्या डावात अपयशी ठरला. त्याला चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत, तर कमिन्स आणि वेबस्टरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी १८१ धावांवर आटोपला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने सहा विकेट गमावल्यानंतर कर्णधार बुमराहने सामना सोडला आणि स्कॅनसाठी रुग्णालयात गेला. बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या उर्वरित वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत उर्वरित चार विकेट झटपट काढल्या. बुमराहच्या अनुपस्थितीत कोहली कर्णधार होता. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी तीन तर नितीश रेड्डी आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पदार्पणातच वेबस्टरचे अर्धशतक
शनिवारी ऑस्ट्रेलियाने एका विकेटवर नऊ धावांनी सुरुवात केली आणि उर्वरित नऊ विकेट गमावून १७२ धावा केल्या. बुमराहने मार्नस लॅबुशेनला सुरेख चेंडूवर बाद केले. यष्टीरक्षक पंत याने त्याचा झेल घेतला. त्याला दोन धावा करता आल्या. तेव्हा सिराज याने भेदक मारा केला. त्याने डावाच्या १२व्या षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांना बाद केले. कोंटास २३ तर हेडला चार धावा करता आल्या. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने स्टीव्ह स्मिथला राहुलकरवी झेलबाद केले. त्याला ३३ धावा करता आल्या. स्मिथला बाद केल्यानंतर प्रसिद्धने ॲलेक्स कॅरीला क्लीन बोल्ड केले. कॅरीला २१ धावा करता आल्या. दरम्यान, पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने अर्धशतक झळकावले.
नितीश रेड्डीचे सलग दोन बळी
नितीश रेड्डीनेही अप्रतिम गोलंदाजी करत सलग दोन चेंडूंत दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार पॅट कमिन्सला कोहलीने झेलबाद केले. कमिन्सला १० धावा करता आल्या. यानंतर नितीश याने डावाच्या ४७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल स्टार्क याला राहुलकडे झेलबाद केले. स्टार्कने एक धाव केली. मात्र, नितीशची हॅटट्रिक हुकली आणि लियॉनने त्याचा चेंडू लेग साईडच्या खाली खेळून एक धाव घेतली. ऑस्ट्रेलियाला १६६ धावांवर नववा धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णाने ब्यू वेबस्टर याला बाद केले. वेबस्टर १०५ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाला. सिराजने बोलंडला (९) क्लीन बोल्ड करून ऑस्ट्रेलियन डाव १८१ धावांवर आटोपला. भारताला नाममात्र चार धावांची आघाडी मिळाली.