
छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंची धमाकेदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : कन्नूर (केरळ) येथे झालेल्या ३५व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले.
भारतीय तलवारबाजी संघटना व केरळ राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कन्नूर येथे ३५व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत पुरुष गटात उपविजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत सायबर प्रकारात अभय शिंदे (छत्रपती संभाजीनगर), आदित्य अंगल (सांगली), निखिल वाघ (छत्रपती संभाजीनगर), धनंजय जाधव (सांगली) या संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले.
इप्पी प्रकारात अनुजा लाड (रायगड), प्राजक्ता पवार (रायगड), सृष्टी जाधव (सातारा) व नर्मदा यादव (रायगड) यांच्या टीमने कांस्यपदक पटकावले.
फॉइल प्रकारात दुर्गेश जहागीरदार (छत्रपती संभाजीनगर), शाकेर सय्यद (छत्रपती संभाजीनगर), तुषार आहेर (छत्रपती संभाजीनगर) व तेजस पाटील (छत्रपती संभाजीनगर) या टीमने कांस्यपदकाची कमाई केली.
वैयक्तिक प्रकारात इप्पी प्रकारात गिरीश जकाते (सांगली) याने रौप्यपदक जिंकले. सायबर प्रकारात अभय शिंदे (छत्रपती संभाजीनगर) याने रौप्यपदक पटकावले. फॉइल प्रकारात तेजस पाटील (छत्रपती संभाजीनगर) याने कांस्यपदक मिळवले.
या सर्व विजय खेळाडूंची उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच सायबर मुलींचा संघ नॅशनल गॅम्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या संघामध्ये कशिष भराड (छत्रपती संभाजीनगर), श्रुती जोशी (नागपूर), शर्वरी गोसेवाड (नागपूर), गौरी साळुंके (बुलढाणा) यांचा समावेश आहे. फॉइल मुलींचा संघ नॅशनल गॅम्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघामध्ये वैदेही लोहिया (छत्रपती संभाजीनगर), अंकिता साळुंके (कोल्हापूर), गायत्री गोटे (छत्रपती संभाजीनगर), मीनाक्षी शिंदे (पुणे) यांचा समावेश आहे. संघ मार्गदर्शक म्हणून अजय त्रिभुवन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील, ‘साई’चे उपसंचालक डॉ. मोनिका घुगे, सहसंचालक सुमेध तरोडेकर, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, एस. पी. जवळकर, गोकुळ तांदळे, डॉ. दिनेश वंजारे, स्वप्नील तांगडे, सागर मगरे आदींनी अभिनंदन करून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.