खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १० तांत्रिक अधिकाऱ्यांची निवड 

  • By admin
  • January 4, 2025
  • 0
  • 86 Views
Spread the love

डॉ. चंद्रजित जाधव यांची स्पर्धा व्यवस्थापकपदी निवड

नवी दिल्ली : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या दहा सदस्यांची खो-खो महासंघाने पहिल्या खो-खो विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.

भारतीय खो-खो महासंघाने अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्र संघटनेला ही माहिती कळवली. या निवडीमुळे महाराष्ट्रातील खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे महासचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.

निवड झालेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांमध्ये डॉ. चंद्रजित जाधव यांच्याकडे स्पर्धा व्यवस्थापक आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आणि प्रशांत पाटणकर हे सह-आयोजक व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी असतील. तसेच सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, संदीप तावडे, सुरेंदर विश्वकर्मा, किरण वाघ, रफीक शेख, किशोर पाटील आणि संदेश आम्रे यांचा यात समावेश आहे.

लिमा लुईस यांची निवड 

अखिल गोवा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष लिमा लुईस यांची आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या आधी ढाका, बांगला देश येथे झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिले आहे.  

गौरवास्पद घटना
महाराष्ट्राच्या खो-खो अधिकाऱ्यांची जागतिक स्तरावर निवड ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. खो-खो खेळाची जागतिक लोकप्रियता वाढत असल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे.

भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव एम. एस. त्यागी यांनी महाराष्ट्र संघटनेला निवड झालेल्या अधिकाऱ्यांना ११ ते २० जानेवारी दरम्यान दिल्ली येथे पाठवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हे अधिकारी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान देऊ शकतील.

महाराष्ट्र खो-खो संघटनेसाठी ही निवड म्हणजे खेळाच्या वाढत्या ग्लोबल मान्यतेचे प्रतीक आहे आणि भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.

..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *