
दोंडाईचा : हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा २३ वा आणि हस्ती वर्ल्ड स्कूल आणि हस्ती गुरूकुल दोंडाईचा या शाळांचा सातवा ‘टाटा’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक क्रीडा महोत्सव हस्ती क्रीडा संकुल येथे शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या देवी सरस्वती, स्व. हस्तीमल जैन, स्व. शांतीलाल जैन, स्व. कांतीलाल जैन यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी उद्घाटक व मुख्य अतिथी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जिम्नॅस्टिक नंदुरबार प्रा. तारक दास, प्राचार्य मेघा मुंगसे, हस्ती स्कूलचा माजी विद्यार्थी हिमांशु पाटील, स्थानिक शालेय सल्लागार समिती उपाध्यक्षा सुगंधा जैन, सुषमा जैन, शितल जैन, बीओडी सदस्य प्राचार्य बी. बी. पाटील, दिलीप वाघेला, गायत्री देशपांडे, हस्ती स्कूल प्राचार्य राजेंद्र त्रिभुवन, प्राचार्य जीवन सपकाळे, मुख्याध्यापक सदाशिव महाजन, उपप्राचार्या रजिया दाऊदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. तारक दास, प्राचार्य मेघा मुंगसे, माजी विद्यार्थी हिमांशु पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छात्र सैनिक परेश पाटील याने ‘शिवगर्जना’ दिली. नॅशनल कॅडेट कॉर्पस् छात्र सैनिक पथक, स्काऊट-गाईड पथक आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचे पथक यांनी संचलन करून अतिथींना मानवंदना दिली.
त्यानंतर पाचवी आणि सहावीच्या बालकलाकारांनी कुस्ती दंगल, बॅडमिंटन, हॉकी स्टिक घेऊन ‘चक दे इंडिया’ या गीतावर तर चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी स्किपिंग घेऊन; इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिड बनवत विविध गीतांवर सुंदर क्रीडा नृत्य सादर केले. तसेच हस्ती पब्लिक स्कूलच्या ४९ महाराष्ट्र बटालियन छात्र सैनिकांनी पुलवामा अटॅक व सर्जिकल स्ट्राइक याच्यावर नाटक सादर केले. यानंतर हस्ती पब्लिक स्कूल, हस्ती वर्ल्ड स्कूल व हस्ती गुरुकुल या शाळांच्या तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी तोंडावर पद्मभूषण रतन टाटा यांचे मुखवटा लावून ‘टाटा लोगो’ व पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तोंडावर सिंहाचे मुखवटे लावून ‘लायन’ या आकारात कवायती सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी पिरॅमिडस् व स्वसंरक्षण खेळ, योगा, सूर्यनमस्कार यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शिक्षक-शिक्षिका आणि पुरूष व महिला पालकांसाठीही धावण्याच्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
विशेषतः दरवर्षी दातृत्वाचा वसा जोपासणाऱ्या के एस गृप दोंडाईचातर्फे स्व. दादाजी हस्तीमलजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ वार्षिक क्रीडा दिनानिमित्त मेडल्स व शिल्ड प्रदान करण्यात येतात. या दिवशी मान्यवरांच्या हस्ते विविध खेळांच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन कौतुक करण्यात आले. तसेच फ़ुटबाँल, व्हॉलिबॉल, थ्रो-बॉल, क्रिकेट, हॉकी, तलवारबाजी, कबड्डी या सांघिक खेळ स्पर्धांमधील विजयी हाऊसेसच्या खेळाडूंना व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
या वार्षिक क्रीडा दिवसात हस्ती गृप ऑफ स्कूलमधील हस्ती पब्लिक स्कूलचा संघ ‘महात्मा गांधी हाऊस’, हस्ती वर्ल्ड स्कूलचा ‘रविंद्रनाथ टागोर हाऊस’, हस्ती गुरुकुलचा ‘महात्मा गांधी हाऊस’ असे तिन्ही स्कूल संघचे ‘बेस्ट हाऊस’ म्हणून निवडले गेले. हस्ती गृप ऑफ स्कूलच्या २०८४ विद्यार्थांनी वार्षिक क्रीडा समारंभात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली जाधव, फातिमा तलोदावला, प्रणाली पाटील, आर्या जैन, प्रियांशी जाधव, खतिजा बोहरी, सिद्धी वाघ, आर्यन जैन तसेच शाळेचे शिक्षक विजय खांडेकर, अमोल बागल, पूनम धनगर, क्रांती बोरसे, धनंजय भदाणे, सुमित चव्हाण आदींनी केले.
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, जितेंद्र सुरवाडे, विशाल पवार, दुर्गेश पवार, निलेश धनगर, दिनेश माळी, धनिक ठाकरे, मनोहर कोळी, पुष्पा साबळे, रोशनी पाटील, कामिनी पाटील, तसेच शाळेचे महेश डिगराळे, प्रवीण गुरव, मनोज ठाकूर, राहुल भामरे, आरती माळी, शमीम कादियाणी, नरेश सावंत, समिना बोहरी, दिव्या गुरव, पूनम गुरबानी सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.