
पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्यातर्फे आयोजित पीडीसीसी अंडर ७, ९, ११ वर्षांखालील मुले व मुली निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत कविश भट्टड, हियान रेड्डी, मंतिक अय्यर, निवान अगरवाल, रिजुल कुऱ्हाडे, समायरा थोरात, प्रीतिका नंदी, अन्वी हिंगे, शाल्वी चास्कर या खेळाडूंनी आपाल्या गटात आघाडी प्राप्त केली आहे.
या स्पर्धेत ७ वर्षांखालील खुल्या गटात पाचव्या फेरीत कविश भट्टडने निश्वंथ रामकुमारला पराभूत करून ५ गुण मिळवले. ९ वर्षांखालील खुल्या गटात पहिल्या पटावर हियान रेड्डीने विहान शहाचा, तर दुसऱ्या पटावर मंतिक अय्यरने आयुश जगतापचा पराभव करून ५ गुण प्राप्त केले. निवान अगरवाल याने शौर्य सोनावणेवर विजय मिळवत ५ गुण मिळवले.
११ वर्षांखालील गटात रिजुल कुऱ्हाडेने ईशान अर्जुन पीवाय याचा पराभव करून ५ गुणांची कमाई केली. ७ वर्षांखालील मुलींच्या गटात चौथ्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत समायरा थोरातने वेदिका मदनेचा पराभव करून ४ गुण मिळवले. प्रीतिका नंदीने रेवा सोंडकरचा पराभव करून ४ गुणांची कमाई केली. ९ वर्षांखालील मुलीच्या गटात अन्वी हिंगेने चार्वी पलरेचाचा पराभव करून ४ गुणांसह आघाडी मिळवली. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात शालवी चास्करने निधी खिंवसराचा पराभव करून ४ गुण मिळवले.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन रॅविक्टरी प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सोहन फडके, पीडीसीसीचे उपाध्यक्ष व ट्रुस्पेसचे संचालक अश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे, चीफ आर्बिटर अथर्व गोडबोले, डेप्युटी चीफ आर्बिटर श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.