खो-खो स्पर्धेत मनूर जिल्हा परिषद प्रशालेचा संघ विजेता 

  • By admin
  • January 5, 2025
  • 0
  • 47 Views
Spread the love

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा संघाला उपविजेतेपद 

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतर शालेय खो-खो स्पर्धेत मनूर येथील जिल्हा परिषद प्रशाला संघाने विजेतेपद पटकावले. राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा संघ उपविजेता ठरला. 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आंतरशालेय मुलांची खो-खो स्पर्धा घेण्यात आली. 

या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक मसलेकर, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, किशोर नागरे, मकरंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव जयप्रकाश गुदगे, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे, भगवान नाईक, शुभम निकाम, शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरी कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजयी संघास व खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २२ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला मनूर, आ. कृ. वाघमारे, राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व राजश्री शाहू विद्यालय वाळूज या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. त्यात जिल्हा परिषद प्रशाला मनूर व राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा यांच्यात अंतिम लढत झाली. अंतिम सामन्यातील लढत ही अतिशय रोमहर्षक झाली. या लढतीत जिल्हा परिषद प्रशाला मनूर संघाने सैनिकी शाळेच्या संघास दोन गुणांनी पराभूत करून विजेतेपद पटकावले. आ. कृ. वाघमारे शाळेस तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला मनुर या संघाचा सार्थक सोळंके याने उत्कृष्ट संरक्षण करत संघास विजय मिळवून दिला तर राजे संभाजी भोसले शाळेचा रुपेश चौधरी याने उत्कृष्ट आक्रमक आणि मनुर संघाचा श्रीकांत दवंडे अष्टपैलू खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील अंतिम विजयी संघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असे रोख पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये रोख तसेच चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सैनिकी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय लोखंडे, सखाराम गायके, मनोहर परसे, मोहन अहिरे, अनिल जगताप, राजू डोंगरदिवे, विजय पाटील, राहुल चव्हाण, जितेंद्र जैन, संजय प्रतापुरे, किरण जोशी, कृष्णा खैरे, गोपीचंद चव्हाण, दर्शन आगवन, राजू सोनवणे व रामकृष्ण काळे तसेच खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनकर यांनी केले. अभय नंदन यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *