
मिझोराम महिला संघाचा १४९ धावांनी पराभव
नागपूर : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १९ महिला एकदिवसीय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विदर्भ महिला संघाने मिझोराम संघावर १४९ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. रिद्धिमा मरडवार आणि धारावी टेंभुर्णे यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
सूरत येथे ही स्पर्धा सुरू आहे. विदर्भ महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावसंख्या उभारली. रिद्धिमा मरडवार हिने शानदार शतक झळकावले. तिने ११३ चेंडूत चार चौकारांसह १०६ धावा फटकावल्या. तिने धनश्री गुजर (नाबाद १८) समवेत नवव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली.
विदर्भ महिला संघाच्या गोलंदाजांनी मिझोराम संघाचा डाव ३०.३ षटकात अवघ्या ५८ धावांत गुंडाळला. धारावी टेंभुर्णे हिने केवळ ८ धावा देत चार विकेट घेत संघाला मोठा विजय मिळवून दिला. यशश्री सोले हिने १६ धावांत तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ संघ : ४५.२ षटकात सर्वबाद २०७ (रिद्धिमा मरडवार १०६, निमिषा २२, जॅसिंटा ३-३७, झोथन संगी ३-४८) विजयी विरुद्ध मिझोराम संघ : ३०.३ षटकात सर्वबाद ५८ (यशश्री सोले ३-१६, धारावी टेंभुर्णे ४-८, धनश्री २-२१).