
प्रत्येक सामना भारतीय संघाने जिंकायला हवा आणि प्रत्येक खेळाडूने आपल्या अपेक्षेनुसार खेळायला हवे, हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वाटणे साहजिक आहे. पण त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर टिकेचा भडीमार व्हावा, हा कसला न्याय? भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने खेळावे की क्रिकेटमधून संन्यास घ्यावा, याविषयी जी काही उलटसुलट चर्चा सुरू आहे, त्याबाबत खूप संवेदनशीलपणे प्रतिक्रिया द्यायला हव्यात. मात्र सध्या तसे होताना दिसत नाही.
हे सर्व सुरू असताना रोहितने, एका मुद्द्याकडे लक्ष दिले आहे, त्याची दखल घ्यायला हवी. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणे ही सोपी गोष्ट नाही. हे सांगताना या पद भूषवणे जितके गौरवास्पद आहे, तितकेच त्याच्यावर जबाबदारीचे ओझे असते, असे त्याने म्हटले आहे. रोहितच्या या म्हणण्याचा खरंच विचार व्हायला हवा. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील वाद किंवा कर्णधाराविषयी धुसफूस या गोष्टी नव्या नाहीत. यापूर्वीही अनेकदा ड्रेसिंग रूम मधील वाद प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र त्यामुळे रोहितला वगळले की त्यानेच न खेळण्याचा निर्णय घेतला, यावर चर्चा करण्याची वेळ आता उलटून गेली आहे. उरला प्रश्न तो कर्णधारपदाच्या ओझ्याचा.
यापूर्वीही अनेकदा चांगला खेळाडू कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करताना टीकेचा धनी झाला आहे. अगदी कपिल देवपासून ते महेंद्र सिंग धोणीपर्यंत सगळ्यांनीच कर्णधार असताना रोहितप्रमाणे टिकेचा सामना केला आहे. रोहितने संघाच्या हिताचा विचार करून शेवटच्या सामन्यातून स्वत:ला वगळण्याचा निर्णय घेतला असला तरी, कोणत्याही खेळाडूला असा निर्णय कठीण असतेच. अशा वेळी जे काही लिहिले जाईल, त्यावर आपले नियंत्रण नाही, असे रोहितने दिलेल्या मुलाखतीत सांगतिले आहे. ही मुलाखत ज्यांनी ज्यांनी वाचली किंवा पाहिली असेल, त्यांनी नक्कीच एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, स्वत:च्या खराब फॉर्मबद्दल त्याने कबुली देताना खेळाडू म्हणून अजूनही संधी आहे, याकडे लक्ष वेधले. खऱ्या खेळाडूचे लक्षणच हे असते, की पुन्हा दमदार आगमन करू, याची ग्वाही तो देतो. रोहितनेही तेच केले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या हिताचा विचार करणाऱ्या कर्णधारांना आजवर अशा कसोटीच्या क्षणाला तोंड द्यावे लागले आहेत. त्यातून ते खेळाडू म्हणून अधिक चांगल्या प्रकारे समोर आल्याची उदाहरणे पाहिली आहेत. रोहितने आपली बाजू मांडल्यानंतर त्याच्या निवृत्तीचा किंवा त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार काही काळ तरी लांबणीवर पडेल, असे मात्र खात्रीने म्हणता येईल.