मुंबई : मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशनतर्फे जिम्नॅस्टिक्स खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ११ जानेवारी रोजी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात सतरावी जिम्नॅस्टिक्स मिनी स्टेट टॅलेंट डिस्प्ले स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील नवोदित खेळाडूंना संधी देण्यासाठी या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेसाठी मुला-मुलींसाठी ८, १०, १२, १४, १६ वर्षांखालील व १६ वर्षावरील असे वयोगट ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक खेळाडूला फ्लोअर एक्झरसाईझ प्रकारात कोणतेही १० प्रकार सादर करायचे आहेत. या स्पर्धेचा मुख्य उद्देश नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध सादरीकरण, आत्मविश्वास आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
गुणांकन पद्धत
खेळाडूंना पारंपरिक गुण व क्रमांक देण्याऐवजी श्रेणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सादरीकरणाच्या काठिण्यापेक्षा खेळाडूंच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल.
नोंदणी आणि सहभाग
यंदाच्या स्पर्धेसाठी आतापर्यंत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील विविध शाळा व क्रीडा संस्थांतील ८०० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. प्रत्येक खेळाडूला संघटनेचे श्रेणी प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात येईल.
प्रशिक्षकांसाठी प्रोत्साहन
२५ पेक्षा अधिक खेळाडूंची प्रवेशिका सादर करणाऱ्या प्रशिक्षकांना संघटनेतर्फे खास टी-शर्ट भेट दिला जाईल.
उद्घाटन समारंभ
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे पार पडेल.
संघटनेचे योगदान
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष संजय शेटे, सचिव डी. डी. शिंदे आणि संघटनेचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा ही संस्था आहे. ही स्पर्धा नवोदित जिम्नॅस्टिक्स खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा आहे.