
ठाणे : प्रणव अय्यंगारच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अनंत धामणे संघाने गणपत भुवड संघावरील पहिल्या डावातील ८८ धावांच्या आघाडीच्या जोरावर ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब आयोजित तुकाराम सुर्वे स्मृती १६ वर्षे वयोगटाच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
गणपत भुवड संघाला पहिल्या डावात ४८.३ षटकांत केवळ १७३ धावांवर रोखल्यानंतर अनंत धामणे संघाने ८८ षटकांत ९ बाद २६१ धावा करून डाव घोषित केला. खेळ संपला तेव्हा गणपत भुवड संघाने दुसऱ्या डावात १८ षटकांत १ बाद ४३ धावा केल्या होत्या, मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे अनंत धामणे संघाने विजय मिळवला.
गणपत भुवड संघाच्या डावात आदित्य कौलगी (४९), तन्मय मालुसरे (३८), आणि अफझल शेख (३६) यांनी उल्लेखनीय योगदान दिले. मात्र, तिलक प्रजापती (३/२२), प्रणव अय्यंगार (३/२४), आणि श्लोक सावंत (२/३२) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
अनंत धामणे संघाच्या फलंदाजीत प्रणव अय्यंगारने १०६ धावांची खेळी करत शतक ठोकले, तर पार्थ पंचमतीयाने ५५ आणि सोहम कांगणेने ३२ धावा करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. गणपत भुवड संघाच्या गोलंदाजांमध्ये तन्मय आगरकर (३/२७), शौर्य साळुंखे (२/३१), अमन सिंग (२/५८), आणि ईशान काळे (२/४३) यांनी प्रभावी कामगिरी केली.
दुसऱ्या डावात गणपत भुवड संघाच्या अफझल शेखने ३४ धावा केल्या, मात्र संघ विजयासाठी आवश्यक धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला.
विशेष पुरस्कार
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : युग पाटील, सर्वोत्तम यष्टीरक्षक : तन्मय मालुसरे, सर्वोत्तम गोलंदाज : तिलक प्रजापती, सर्वोत्तम फलंदाज : सम्रीध भट, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: आदित्य कौलगी.