
नागपूर (सतीश भालेराव) : रेल्वेची रनरागिणी म्हणून गाजणाऱ्या आणि ज्ञान उदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. छाया जनबंधू यांचा राष्ट्रीय पुरस्कार ‘नारी शक्ती’ देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. छाया शिशिर जनबंधू या आंतरराष्ट्रीय खेळाडू असून नुकत्याच मलेशिया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारताचा नावलौकिक वाढवला होता. २०२५ या वर्षी अमेरिका येथे होणाऱ्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी त्या पात्र ठरलेल्या आहेत. तसेच त्या भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असून ‘आत्मसंरक्षण’ बिकट प्रसंग ओढवल्यास कसे करायचे याचे प्रात्यक्षिक त्या शाळा व कॉलेजमध्ये जाऊन विनामूल्य देतात. हा उपक्रम २०१७ पासून त्या राबवत आहेत. भारतातील १५ राज्यात जाऊन १० लाखाहून अधिक मुले-मुली, महिला, वरिष्ठ नागरिकांना ‘आत्मसंरक्षित’ केले आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘नारी शक्ती पुरस्कार’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, क्रांती महाजन, एस. सिंह, नरेशचंद्र कटोले, सरदार किरण सिंग, शैलेंद्र चौरसिया यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. छाया शिशिर जनबंधू यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे विभागातील सहकारी व क्रीडा शिक्षक आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.