
सिद्धेश वीरचे धमाकेदार शतक, राहुल त्रिपाठीसमवेत १४७ धावांची भागीदारी निर्णायक
विजय हजारे ट्रॉफी
नवी मुंबई : सिद्धेश वीरच्या धमाकेदार शतकाच्या बळावर महाराष्ट्र संघाने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आंध्र प्रदेश संघावर पाच विकेट राखून शानदार विजय नोंदवला. या स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा सलग सहावा विजय आहे.
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर हा सामना झाला. आंध्र प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सात बाद २७० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कर्णधार के एस भरत (०) तीन चेंडू खेळून बाद झाला. त्यानंतर अश्विन हेब्बर (४९), एस के रशीद (४२), रिकी भुई, यारा संदीप (१९), विनय (४६) या मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरला. आठव्या क्रमांकावरील फलंदाज के व्ही शशिकांत याने सर्वाधिक नाबाद ५२ धावा काढल्या. त्याने २५ चेंडूत नाबाद ५२ धावा फटकावत डावाला आकार दिला. त्याने आपल्या धमाकेदार खेळीत चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. राजू ४ धावांवर नाबाद राहिला. शशिकांतच्या आक्रमक फलंदाजीमुळे आंध्र प्रदेशने ५० षटकात सात बाद २७० धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.
महाराष्ट्र संघाकडून रजनीश गुरबानी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. गुरबानीने ६१ धावांत तीन गडी बाद केले. मुकेश चौधरी याने ५२ धावांत दोन बळी घेतले. सत्यजित बच्छाव याने एक विकेट घेण्यासाठी तब्बल ७० धावा मोजल्या.
महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी २७१ धावांचे आव्हान होते. कर्णधार रुतुराज गायकवाड (१२), ओम भोसले (९) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. पाठोपाठ भरवशाचा फलंदाज अंकित बावणे ४ धावांवर बाद झाला. त्यावेळी महाराष्ट्र संघाची स्थिती तीन बाद ३४ अशी बिकट झाली होती.
तीन बाद ३४ अशा बिकट स्थितीत सिद्धेश वीर आणि राहुल त्रिपाठी या जोडीने शानदार अर्धशतके ठोकत डाव सावरला. सिद्धेश व राहुल या जोडीने चौथ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी करुन सामन्यांत रंगत आणली. ३३व्या षटकात संदीप याने राहुल त्रिपाठीची आक्रमक खेळी ६९ धावांवर संपुष्टात आणली. त्याने नऊ चौकार मारले. त्यानंतर अजीम काझी दोन चौकारांसह १५ धावांचे योगदान देऊन बाद झाला.
सिद्धेश वीर याने कठीण परिस्थितीतून डाव सावरताना आक्रमक फटकेबाजीसह धावगती कायम ठेवली. सिद्धेश वीरने ११० चेंडूत शतक झळकावत संघाला विजयासमीप आणले. सिद्धेश वीर आणि निखिल नाईक या जोडीने संघाच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.सिद्धेश याने १२४ चेंडूत नाबाद ११५ धावा फटकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. निखिल नाईकने नाबाद २८ धावांची आक्रमक खेळी करताना एक षटकार व तीन चौकार मारले. महाराष्ट्र संघाने ४७.३ षटकात पाच बाद २७४ धावा फटकावत शानदार विजय साकारला. आंध्र प्रदेशच्या यारा संदीप याने २९ धावांत दोन गडी बाद केले.