
छत्रपती संभाजीनगरच्या यश साठे, ऋचा वराळे यांना उपविजेतेपद
पुणे : उंद्री येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत आयुष वर्मा व योमिका खंडेलवाल यांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीत करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातून ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. १९ वर्षांखालील गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबईच्या आयुष वर्मा याने छत्रपती संभाजीनगरच्या यश साठे याचा २-० असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. मुंबईचा नील पासवान याने तृतीय तर मुंबईच्या आकाश चंद याने चतुर्थ स्थान संपादन केले.
मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाच्या योमिका खंडेलवाल हिने छत्रपती संभाजीनगरच्या ऋचा वरळी हिचा २-० असा पराभव करुन विजेतेपद संपादन केले. ऋचाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मैत्री शर्मा हिने तृतीय क्रमांक मिळवला.
पारितोषिक वितरण
या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या खेळाडूंना पुणे क्लबचे अध्यक्ष गौरव घोडके यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, पुणे स्क्वॉश रॅकेट संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, वैशाली दराडे, अश्विनी हत्तरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत पंच म्हणून सतीश पोतदार, गोविंद सिंग, नितेश पोतदार, प्रियांका मंत्री, गणेश तांबे, रोहिदास गाडेकर, क्रिश कलकुटी आदींनी काम पाहिले.