
सिडनी : सिडनी कसोटीत भारतीय संघाला पराभूत करुन कर्णधार पॅट कमिन्स याने १० वर्षांनंतर संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून दिली. भारतासारख्या संघाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान आवश्यक आहे असे मंत्र कमिन्स याने या मालिका विजयानंतर दिला आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला नव्या उंचीवर नेले आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध केवळ एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल जिंकली नाही तर २०१४-१५ नंतर प्रथमच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी देखील जिंकली. कमिन्सने या मालिकेत २५ बळी घेतले आणि आपल्या संघाला ३-१ असा संस्मरणीय विजय मिळवून दिला. भारताचा पराभव करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर कब्जा केल्यानंतर कमिन्सने आपल्या विजयाचे रहस्यही उघड केले आहे.
इतिहास घडवत विजय
तब्बल दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून ही ट्रॉफी जिंकली. शेवटच्या विजेत्या संघातून फक्त मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्टीव्ह स्मिथ संघात होते. या विजयानंतर पॅट कमिन्स म्हणाला, ‘ही एक ट्रॉफी होती जी आमच्या संघातील काही खेळाडूंकडे नव्हती. आम्ही ती जिंकली याचा आम्हाला अभिमान आहे.’
कमिन्स म्हणाला की, ‘पर्थमधील पराभवानंतर संघाने हार मानली नाही. आम्हाला माहित होते की आमची कामगिरी सरासरीपेक्षा कमी आहे, परंतु आम्ही संयम राखला आणि आमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केले,’ तो म्हणाला.
भारतासारख्या संघाला हरवण्याचा मंत्र
ऑस्ट्रेलियाने या मालिकेत तीन नवीन खेळाडूंना संधी दिली. अष्टपैलू ब्यू वेबस्टर, सलामीवीर नॅथन मॅकस्विनी आणि सॅम कॉन्स्टास यांनी पदार्पण केले. त्याचबरोबर स्टार्क, स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या अनुभवी खेळाडूंनीही महत्त्वाचे योगदान दिले. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्ही नेहमीच मजबूत संघावर विश्वास ठेवला आहे. नवीन खेळाडू सहजपणे संघात बसवले आणि त्यांची भूमिका निभावली. भारतासारख्या संघाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान आवश्यक आहे.’
कमिन्सचे पुढील लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिप हे आहे. या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलिया जूनमध्ये लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे रक्षण करेल. पॅट कमिन्स यांनी या यशाचे वर्णन संपूर्ण गटाच्या कठोर परिश्रमाचे आणि कुटुंबांच्या बलिदानाचे फळ असल्याचे सांगितले. कमिन्स म्हणाला की, ‘हा एक अतिशय खास संघ आहे, जिथे प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम द्यायला तयार असतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.’