
अंजू बॉबी जॉर्ज वरिष्ठ उपाध्यक्षपदी
नवी दिल्ली : बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारे शॉटपुटर पद्मश्री बहादूर सिंग सागो हे भारतीय ॲथलेटिक महासंघाचे नवे अध्यक्ष असतील. ते माजी ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला यांची जागा घेतील. ६७ वर्षीय सुमारीवाला यांचे तीन कार्यकाळ पूर्ण झाले असून ते पुढील निवडणूक लढवू शकत नाहीत.
सिडनी आणि अथेन्स ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या बहादूर सिंग यांची सात आणि आठ जानेवारीला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती अंजू बॉबी जॉर्ज यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड होणार आहे. त्या सभापतीपदासाठी लढत होत्या, मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
१९९८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारे ज्योतिर्मय सिकदार संयुक्त सचिव होणार आहेत. संदीप मेहता हे एएफआयचे नवे सरचिटणीस असतील. २०१० ग्वांगझू एशियाड सुवर्ण विजेती सुधा सिंग आणि 100 मीटर राष्ट्रीय विक्रम धारक रचिता मिस्त्री, हरजिंदर सिंग आणि प्रियांका भानोत हे कार्यकारी सदस्य असतील. बहादूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली २०३६ पर्यंतच्या ऑलिम्पिकची रूपरेषा आखली जाणार आहे.