
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा पहिल्यांदाच सहभागी होत जिंकली
छत्रपती संभाजीनगर : पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा जिंकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महिला संघाने एक नवा इतिहास घडवला आहे. विद्यापीठ महिला बुद्धिबळ संघाचे हे पहिले आणि ऐतिहासिक विजेतेपद आहे.
भोपाळ येथील सॅम विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बुद्धिबळ स्पर्धा झाली. या स्पर्धेत विद्यापीठाचा महिला संघ प्रथमच सहभागी झाला होता. सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यापीठ महिला संघाने धमाकेदार कामगिरी नोंदवत ऐतिहासिक विजेतेपदाला गवसणी घातली.
विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासात नवा पराक्रम नोंदवणाऱ्या विद्यापीठ महिला संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा बोरामणीकर,
भाग्यश्री पाटील, सानिया तडवी, साचल बिहाणी, संस्कृती वानखेडे, संघमित्रा या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक विलास राजपूत व व्यवस्थापक रेणुका देशपांडे-बोरामणीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत पहिल्या फेरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महिला संघाने डॉ. सुभाष विद्यापीठ जुनागड गुजरात संघाला ४-० असे हरवत स्पर्धेची सुरेख सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत गुजरात टेक्नॉलॉजी विद्यापीठ संघावर ४-० असा दणदणीत विजय साकारत आगेकूच कायम ठेवली. तिसऱ्या फेरीत बलाढ्य भारती विद्यापीठ पुणे संघातील खेळाडू आकांक्षा हगवणे हिला भाग्यश्री पाटील हिने बरोबरीत रोखत आपल्या संघाला ०.५ गुण मिळवून दिला. सानिया तडवी, संस्कृती वानखडे व तनिषा बोरामणीकर यांनी विजय संपादन करुन विद्यापीठ संघाला ३.५-०.५गुण मिळवत स्पर्धेत आघाडी मिळवून दिली.
चौथ्या फेरीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे सोबत ३.५-०.५ असा विजय साकारत विद्यापीठ महिला संघाने विजेतेपदाकडे आगेकूच केली. बलाढ्या युनिव्हर्सिटी ऑफिस मुंबई संघाविरुद्ध शानदार कामगिरी बजावत३.५-०.५ विजय मिळवून विजेतेपदावर आपली पकड मजबूत केली. सहाव्या फेरीत महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक संघाचा ३.५-०.५ असा पराभव करुन विजेतेपदाची औपचारिकता शिल्लक ठेवली. सातव्या व अंतिम फेरीत वीर नर्मदा साऊथ गुजरात युनिव्हर्सिटी संघाला ४-० अशा गुण फरकाने नमवून विद्यापीठ संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
खेळाडूंच्या या शानदार यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप, प्रशिक्षक डॉ. मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीत सिंग दिक्कत, गणेश कड, डॉ. रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी अभिनंदन केले आहे.
कोट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला बुद्धिबळ संघ या स्पर्धेत प्रथमच खेळत होता. पहिल्याच स्पर्धेत महिला संघाने विजेतेपद पटकावून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला आहे. महिला बुद्धिबळ संघाने नवा इतिहास रचत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
– डॉ. संदीप जगताप, क्रीडा संचालक, विद्यापीठ.