
बीसीसीआय अंडर २३ टी २० ट्रॉफी : खुशी मुल्लाची अष्टपैलू कामगिरी निर्णायक
पुणे : रायपूर येथे सुरू असलेल्या बीसीसीआयच्या अंडर २३ महिला टी २० ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने बंगाल संघावर चार विकेट राखून विजय नोंदवला. खुशी मुल्लाची ६० धावांची खेळी महत्त्पूर्ण ठरली.
बंगाल महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद १३८ धावा काढल्या. त्यात सुजाता डे (३६), स्नेहा गुप्ता (३०), ह्रषिता बासू (२०) यांनी डावाला आकार दिला. खुशी मुल्ला हिने २१ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. आदिती वाघमारे हिने २२ धावांत दोन बळी घेतले.
महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी १३९ धावांचे आव्हान होते. खुशी मुल्लाच्या धमाकेदार ६० धावांच्या खेळीच्या बळावर महाराष्ट्र महिला संघाने सहा बाद १४२ धावा काढून विजय साकारला. गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यानंतर खुशी मुल्ला हिने फलंदाजीत आपला ठसा उमटवला. तिने ५३ चेंडूत ६० धावा फटकावल्या. तिने एक षटकार व आठ चौकार मारले. ईश्वरी अवसरे हिने पाच चौकारांसह ३७ धावा फटकावत तिला सुरेख साथ दिली. यशोदा घोगरे हिने अवघ्या पाच चेंडूत नाबाद २२ धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यशोदाने आपल्या स्फोटक खेळीत एक षटकार व चार चौकार मारले. बंगाल संघाकडून मानिनी रॉय हिने ११ धावांत तीन विकेट घेतल्या. जुम्पा रॉय हिने २९ धावांत दोन बळी मिळवले.