
छत्रपती संभाजीनगर : भारतीय तलवारबाजी महासंघ तसेच उत्तराखंड तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते ११ जानेवारी दरम्यान रुद्रपुर (उत्तराखंड) येथे होणाऱ्या १९व्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी यशश्री वंजारे हिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या राज्य स्पर्धेमध्ये सांघिक प्रकारात सुवर्ण तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक संपादन केले होते. या कामगिरीच्या आधारे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, एमजीएम स्कूलच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, प्राचार्य उषा जाधव, मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी, क्रीडा शिक्षक शरद पवार आदींनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.