
कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना निवडावे : हरभजन सिंग
नवी दिल्ली : न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही भारतीय संघास कसोटी मालिका गमवावी लागली. या पराभवांमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाद झाला. भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर माजी फिरकीपटू हरभजनसिंग हा कमालीचा नाराज झाला आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील ‘सुपरस्टार संस्कृती’ संपुष्टात आणावी आणि केवळ कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड करावी, अशी थेट मागणी हरभजनने केली आहे.
हरभजन सिंग याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ‘भारतीय संघात सुपरस्टार संस्कृती निर्माण झाली आहे. आम्हाला सुपरस्टार नको आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. संघात चांगले खेळाडू असतील तरच संघाची प्रगती होईल. ज्याला सुपरस्टार बनायचे आहे त्याने घरीच राहून क्रिकेट खेळावे. आता इंग्लंड दौरा येत आहे (जूनमध्ये). आता त्यात काय होणार, संघात कोण असणार आणि कोण नाही यावर आता सर्वांचीच चर्चा रंगणार आहे. माझा विश्वास आहे की हा एक सरळ मुद्दा आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात घ्यावे. प्रतिष्ठेच्या आधारावर तुम्ही संघ निवडू शकत नाही.’
निवडकर्त्यांना कठोर व्हावे लागेल
हरभजन म्हणाला, ‘तुम्हाला हे करायचे असेल तर कपिल देव सर आणि अनिल भाई (कुंबळे) यांनाही घ्या. येथे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना कठोर राहावे लागेल. सुपरस्टार वृत्तीने संघ पुढे जाऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली खराब फॉर्ममध्ये होते. या पराभवामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची संधी देखील गमावली.’
कामगिरीच्या आधारे संघ निवडावा
कोहलीने नऊ डावांत १९० धावा केल्या आणि नऊपैकी आठ डावांत तो विकेटच्या मागे झेलबाद झाला. हरभजन म्हणाला की, ‘खराब फॉर्मशी झगडणाऱ्या क्रिकेटपटूंनी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळून इंग्लंड दौऱ्यासाठी आपली योग्यता सिद्ध केली पाहिजे. कामगिरीच्या जोरावर संघ निवडला गेला पाहिजे. मग तो विराट कोहली असो, रोहित किंवा अन्य कोणीही. कोणताही खेळाडू संघापेक्षा मोठा नसतो, जरी त्याला तो मोठा सुपरस्टार वाटत असेल. भारतीय क्रिकेटला पुढे न्यायचे असेल तर कठीण प्रश्न विचारावे लागतील.’
हरभजन म्हणाला, ‘त्यांना वगळण्यात यावे, असे मी म्हणत नाही, पण खराब फॉर्मशी झगडणाऱ्या खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी काही क्रिकेट खेळले असेल तरच त्यांची निवड करावी. विराट कोहलीने २०२४ मध्ये ११ कसोटीत ४४० धावा केल्या आणि २३.१५ च्या सरासरीने. ते मोठे नाव आहे, त्यामुळे हे आकडे विचित्र वाटतात. मलाही आश्चर्य वाटले. एखाद्या तरुणाला संधी दिली तर तोही इतक्या धावा करेल.’
जसप्रीत बुमराह नसता तर भारत ५-० किंवा ४-० असा हरला असता, असेही तो म्हणाला. हरभजन म्हणाला, ‘बुमराहला कठोर परिश्रम करायला लावले आहेत. ट्रॅव्हिस हेड आला तर बुमराहला चेंडू द्या, लॅबुशेन आला तर बुमराहला चेंडू द्या, स्टीव्ह स्मिथ आला तर बुमराहला चेंडू द्या. शेवटी तो किती ओव्हर टाकणार? त्याची पाठ मोडली आहे. तो किती षटके टाकणार हे संघ व्यवस्थापनाला ठरवावे लागेल.’