
विजय हजारे ट्रॉफी : मिझोराम संघावर १० विकेटने दणदणीत विजय
नागपूर : विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाने मिझोराम संघाचा दहा विकेट राखून पराभव करत स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील विदर्भ संघाचा हा सलग सहावा विजय आहे. विदर्भ संघाने २४ गुणांसह ड गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. हर्ष दुबे याच्या नेतृत्वाखाली विदर्भ संघाच्या गोलंदाजांनी मिझोराम संघाला २२.१ षटकात केवळ ७२ धावांत गुंडाळले. हर्ष दुबे याने २१ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. पार्थ रेखाडे व आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हर्ष दुबे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विदर्भ संघाचे सलामीवीर अथर्व तायडे आणि अपूर्व वानखडे यांनी अवघ्या ८.५ षटकांत ७३ धावा ठोकल्या आणि संघाला १० विकेटने विजय मिळवून दिला. वानखडे याने ३० चेंडूत नाबाद ५० धावा फटकावल्या. तायडे २१ धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक : मिझोराम : २२.१ षटकांत सर्वबाद ७२ (हर्ष दुबे ४/२०, पार्थ रेखाडे २/१, आदित्य ठाकरे २/२१, यश कदम २/६) पराभूत विरुद्ध विदर्भ : ८.५ षटकांत बिनबाद ७३ (अथर्व तायडे नाबाद २१, अपूर्व वानखडे नाबाद ५०).