
आयेशा शेख, रसिका शिंदेची शानदार फलंदाजी, ऐश्वर्या वाघची प्रभावी गोलंदाजी
पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सिक्किम महिला संघावर ११९ धावांनी दणदणीत विजय साकारला.
रायपूर येथे होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद १५६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. आयेशा शेख हिने ४३ चेंडूत ६१ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने तीन उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. रसिका शिंदे हिने २९ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी करत डावाला आकार दिला. तिने सहा चौकार मारले. सलामीवीर खुशी मुल्ला हिने पाच चौकारांसह २७ धावांचे योगदान दिले. श्वेता सावंत (६), ईश्वरी सावकार (०) या लवकर बाद झाल्या. सिक्कीम संघाकडून लिझा हिने ८ धावांत तीन विकेट घेतल्या.
सिक्कीम संघासमोर विजयासाठी १५७ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना सिक्कीम संघ १९.३ षटकात अवघ्या ४१ धावांत गारद झाला. लिझा हिने सर्वाधिक १६ धावा काढल्या. अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. महाराष्ट्र महिला संघाकडून ऐश्वर्या वाघ हिने ६ धावांत तीन विकेट घेत आपली चमक दाखवली. खुशी मुल्ला (२-६), आदिती वाघमारे (२-३) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी दोन गडी बाद केले. श्वेता सावंत (१-१२) व चिन्मयी बोरफळे (१-२) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.