
मुंबई : गतविजेत्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने अणुशक्तीनगर स्पोर्ट्स अँड रेक्रीएशन क्लबचा १८ धावांनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती ढाल टी २० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब संघाने स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपचा ८ विकेट्सनी पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवले.
युनायटेडने ६ बाद १८५ धावांचे भक्कम आव्हान दिले, त्याला प्रत्युत्तर देताना अणुशक्तीनगरचा संघ ६ बाद १६७ धावांवरच थांबला. युनायटेडच्या विजयात सागर शहाने १५ धावांत ३ विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली.
दुसऱ्या लढतीत स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुपने १३३ धावांचे आव्हान उभारले. मात्र स्पोर्ट्स फिल्डने १७.४ षटकांत २ बाद १३४ धावा करत सहज विजय मिळवला. या सामन्यात अनुराग दिवेकरने गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्या, तसेच नाबाद ४७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक : १) युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन : २० षटकांत ६ बाद १८५, (अजय जयस्वाल ९१, सागर ४६; दर्शन अडारकर ३४ धावांत २ विकेट्स) विजयी विरुद्ध अणुशक्तीनगर स्पोर्ट्स अँड रेक्रीएशन क्लब : २० षटकांत ६ बाद १६७, (गणेश पाटील ५२; सागर शहा १५ धावांत ३ विकेट्स, प्रसाद रहाटे २४ धावांत २ विकेट्स). सामनावीर : सागर शहा (युनायटेड).
२) स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप : १८.१ षटकांत १३३, (दीपेश गुलाम ३८, ईशान मिठबावकर ३३, अनुराग दिवेकर १८ धावांत ३ विकेट्स, शशांक कामत २२ धावांत २ विकेट्स) पराभूत विरुद्ध स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब: १७.४ षटकांत २ बाद १३४ (श्रीराम पाल नाबाद ६१, अनुराग दिवेकर नाबाद ४७). सामनावीर : अनुराग दिवेकर (स्पोर्ट्स फिल्ड).