
बीसीसीआयची १२ जानेवारीला मुंबईत सर्वसाधारण सभा
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीचा फटका संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना बसण्याची चिन्हे आहेत. बीसीसीआय येत्या १२ जानेवारी रोजी प्रशिक्षकांचे रिपोर्ट कार्ड पाहणार आहे. या दिवशी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा मुंबईत होणार आहे.
या बैठकीचा मुख्य अजेंडा सचिव आणि खजिनदार पदाची निवडणूक आहे आहे. जय शाह यांच्या जागी देवजीत सैकिया यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून ते सप्टेंबर २०२५ पर्यंत या पदावर राहतील. तर कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांचा दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
टेलिग्राफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत गौतम गंभीर आणि त्याच्या प्रशिक्षक संघाच्या कामगिरीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक मुद्दा नसला तरी अलीकडची कामगिरी पाहता गंभीरच्या कोचिंगबाबत बोर्डातील काही सदस्यांमध्ये असंतोष वाढत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ ने पराभव झाल्याने भारतीय संघ गंभीर संकटात सापडला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी गंभीरसाठी शेवटची संधी?
गौतम गंभीरसाठी सर्वात मोठे संकट म्हणजे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा गंभीरच्या कार्यकाळातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, तर त्यांच्या कोचिंगवर मोठे प्रश्न उपस्थित होण्याची खात्री आहे.
खराब फॉर्म आणि प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती ही भारतीय संघाच्या अलीकडच्या अपयशामागील प्रमुख कारणे आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे, तर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे गोलंदाजी कमकुवत झाली आहे.
गौतम गंभीरचा कोचिंग कार्यकाळ
गौतम गंभीरने सप्टेंबर २०२४ मध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. जेव्हा भारतीय संघ टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या शिखरावर होता. त्यावेळी भारत कसोटी आणि वन-डेमध्ये देखील मजबूत स्थितीत होता. बांगलादेशला कसोटीत २-० ने पराभूत करून गंभीरने आपल्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ सुरू केला. मात्र त्यानंतर संघाची कामगिरी घसरत गेली.
भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत भारताला ०-३ ने पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडला. त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.